आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक्स्प्रेस फीडर’साठी पुन्हा अडथळ्यांची शर्यत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषदेसाठी स्वतंत्र एक्स्प्रेस फीडर लष्कराच्या परवानगीअभावी रखडले आहे. जिल्ह्यातील खासदारांकडून यासाठी प्रयत्न केला जात असला, तरी त्याला अद्याप यश आले नाही. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे, तसेच इतर कारणांनी बत्ती गुल झाल्यास संपूर्ण जिल्हा परिषदे मुख्यालयातील कामकाज वेळोवेळी ठप्प होते.

जिल्हा परिषदेत संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सुरू असतो. त्यासाठी सर्व विभागांमध्ये संगणक बसवण्यात आले आहेत. सर्व संगणक लॅनच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण कामकाज ठप्प होऊन कर्मचार्‍यांना अघोषित सुटीही मिळते. विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेने 2006 मध्ये आठ लाख रुपये खर्च करून जनरेटर खरेदी केले. मात्र, हे जनरेटर काही तासांतच ते बंद पडले. जिल्हा परिषदेने संबंधित जनरेटर कंपनीविरोधात ग्राहकमंचाकडे दाद मागितली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

विजेच्या लपंडावामुळे वारंवार कामकाज ठप्प होते. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून 2011 मध्ये एक्स्प्रेस फीडरसाठी प्रयत्न झाले. भिंगार येथील वीज उपकेंद्रापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत फीडरचे अंतर सुमारे अडीच किलोमीटर आहे. यासाठी 44 खांबांवर वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. परंतु काही खांब लष्कराच्या हद्दीतून जाणार असल्याने लष्कराची परवानगी आवश्यक आहे. यासाठी जि. प. विद्युत विभागाने पाठपुरावा केला. परंतु अद्याप यश आले नाही. लष्कराची हद्द वगळता इतर ठिकाणी खांब उभारण्यात आले. यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला. या कामास विलंब होत असल्याने खर्च वाढत आहे. यासाठी विद्युत विभागाचे अभियंता दिलीप वडे यांनी लष्कराकडे पाठपुरावा केला. या कामाला गती देण्यासाठी लष्करासोबत समन्वय करार करण्यात येणार आहे. यानुसार जिल्हा परिषदेला केवळ खांब बसवण्याची परवानगी असून त्यावर हक्क सांगता येणार नाही, असे जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीदेखील प्रयत्न केले. परंतु या प्रकल्पाची अडथळ्यांची शर्यत सुरूच आहे. वडे यांनी पंधरा दिवसांपूर्वी लष्कराच्या अंतिम मंजुरीसाठी दिल्लीला प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस फीडर व्हायला आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.