आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: पंधरा हजारांच्या बनावट दारूचे 7 बळी, पांगरमल ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कँटीनमध्ये सापडलेल्या दारूची पाहणी करताना पोलिस अधिकारी. - Divya Marathi
कँटीनमध्ये सापडलेल्या दारूची पाहणी करताना पोलिस अधिकारी.
नगर- सिव्हिलहॉस्पिटलच्या आवारातील कँटीनमधून खरेदी केलेली दारु पंधरा हजार रुपयांची असल्याचे पुढे आले. अवघ्या पंधरा हजार रुपयांच्या या दारुमुळे नगर तालुक्यातील पांगरमल येथील सात जणांचे संसार उघड्यावर आले अाहेत. दरम्यान, पांगरमल येथील दारुबळींची संख्या आता सातवर गेली अाहे. दोन जण अजूनही अत्यवस्थ आहेत. या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्याने या प्रकरणातील एक आरोपी जाकीर शेख याच्या विरोधात तोफखाना पोिलस ठाण्यात गुरुवारी जुगारविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. 

अटकेत असलेल्या आरोपींच्या फोन कॉलची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मोबाइल कंपन्यांना पत्र पाठवले अाहे. सर्व कॉल्सची सविस्तर माहिती या कंपन्यांकडून शुक्रवारी मिळेल. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग येईल. 

पांगरमल येथे एका राजकीय नेत्याने दिलेल्या मेजवानीत बनावट दारुचे सेवन केल्यामुळे पोपट रंगनाथ आव्हाड, राजेंद्र खंडू आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड प्रभाकर पेटोरे या चारजणांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी हिरोजी नाना वाकडे राजेंद्र भानुदास आव्हाड या आणखी दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी शहादेव भाऊराव आव्हाड दगावले. या घटनेतील आणखी अकरा जणांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. 

या प्रकरणी प्रारंभी पाेलिसांनी भीमराव आव्हाड याला अटक केली होती. चौकशीत त्याने सिव्हिलच्या कँटीनमधून दारु खरेदी केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. कँटीनचा मालक असलेला माजी नगरसेवक जितू गंभीर, त्याचबरोबर कँटीन चालवणारा तथाकथित पत्रकार जाकीर शेख हनिफ शेख या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. या तिघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य या प्रकरणाची व्याप्ती, त्याचबरोबर आणखी कोण सहभागी आहेत याच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी न्यायालयात केली. दरम्यान आरोपींच्या फोन कॉलची सविस्तर माहिती आल्यानंतर या प्रकरणाचा तपासाला आणखी वेग येईल. 

आरोपी भीमराव आव्हाड याने कॅँटीनमधून दोन देशी दोन विदेशी दारुचे बॉक्स खरेदी केले होते. त्यांची किंमत पंधरा हजार रुपये आहे. दोन बॉक्सचे पैसे त्याने कँटीनचालकाला दिले होते. बाकीची रक्कम नंतर दिली जाणार होती, असे चौकशीत पुढे आले. 

अण्णांच्यापत्राचा विसर
कोपर्डी दुर्घटनेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्यात दारुबंदी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, आठ महिने उलटूनही हजारे यांच्या पत्रावर कार्यवाही झालेली नाही. 

राज्यभरात ही दारू गेल्याचा संशय 
सात बळी गेल्यानंतर जाग्या झालेल्या पोलिस उत्पादन शुल्कने सिव्हिलच्या कँटीनमधून दारु तयार करण्याचे साहित्य जप्त केले. पांगरमल येथे गेलेल्या दारुच्या लॉटमधून राज्यभरात हजार बॉक्स गेल्याचे कळते. राज्यभरात वितरित झालेल्या या दारुच्या प्रत्येकी पाच बाटल्या नमुन्यासाठी मागवण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली. 
 
कॉलची माहिती मिळेल आज, पोलिस आरोपींच्या मागावर... 
याप्रकरणातीलआरोपींचे मागील काही दिवसांत फोनवर कुणाशी संभाषण झाले, याची माहिती घेण्यासाठी मोबाइल कंपन्यांना पत्र दिले आहे. शुक्रवारी सर्व कॉलचा अहवाल पोलिस प्रशासनाला प्राप्त होईल. या प्रकरणातील आणखी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली असून, ते आरोपींच्या मागावर आहेत. आनंदभोईटे, तपासी अधिकारी, पोलिस उपअधीक्षक. 

पांगरमलच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार 
पांगरमल(ता. नगर) येथे बनावट दारूमुळे सात जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध केला. त्यामुळे गावातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. दिवसभरात मतदानाचा टक्का शून्य राहिला. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी देण्यात आलेल्या स्थानिक उमेदवाराकडील मेजवानीतील दारूमुळे पांगरमल येथील सहा तेथून दोन किलोमीटरवरील शिंगवे केशव येथील एक असे सात जणांचे बळी गेले आहेत. सातवा मृत्यू गुरुवारी झाला.त्यामुळे गावावर शोककळा कायम राहिली. या घटनेच्या निषेधार्थ पांगरमलच्या ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावर संपूर्ण बहिष्कार घातला. या गावात एक हजार ७९ मतदान आहे. त्यात पुरुषांचे ५८३, तर महिलांचे मतदान ४९६ आहे. बहिष्काराबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे जिल्हा पोलिसप्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी गावात बैठक घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनाला जुमानता ग्रामस्थ मतदान करण्यावर ठाम राहिलेे. 
बातम्या आणखी आहेत...