आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट विश्‍वस्त बनून मालमत्ता विकणा-यांना उच्‍च न्यायालयाचा दणका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर, पुणे व मुंबई या तीन जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या ख्रिस्ती मिशन संस्थेच्या विश्वस्तांसंबंधी सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवून बारामती (जि. पुणे) येथील काही लोकांचा बनावट विश्वस्त बनून संस्थेची मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नांना दणका दिला आहे. ही माहिती संस्थेचे सचिव रेव्हरंड डॉ. नितीशकुमार वाघमोडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या निकालाबरोबरच संस्थेचे अध्यक्ष डी. एम. भालेराव, उपाध्यक्ष जे. बी. आवळे, सचिव वाघमोडे, खजिनदार शिरीष वाघमोडे, विश्वस्त सुभाषचंद्र पाटील, जयप्रकाश गायकवाड, वैभव पारधे, स्टिव्हन साठे, हरीश सातपुते यांची सन 2016 पर्यंत नियुक्ती केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ते म्हणाले, हा सर्व वाद संस्थेच्या मालमत्तेबाबत आहे. संस्थेची नगर जिल्ह्यातील र्शीगोंदे, ढोरजे, भानगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, दौंड, इंदापूर, भिगवण व मुंबईत कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, ऐरोली, डोंबिवली आदी ठिकाणी जमीन आहे. या जमिनींवर संस्थेचे 20 चर्च, पाच शाळा, दोन अनाथार्शम, एक रुग्णालय व यूथ होस्टेल आहे. ही सर्व मालमत्ता शहरांत मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यावर बिल्डरांचा डोळा आहे. विशेषत: बारामतीत असलेल्या संस्थेच्या 80 एकर जमिनीवर तेथील नामांकित बिल्डर व बड्या राजकारण्यांचा डोळा आहे. ही मालमत्ता स्वस्तात बळकावण्यासाठी त्यांनी संस्थेच्या रॉबर्ट गायकवाड या कर्मचार्‍याला हाताशी धरून सर्व बनाव रचला. गायकवाडने स्वत:सह वसंत गायकवाड, सुजित बहिरू जाधव, राजन पाटोळे, शांतवन रणदिवे, भास्कर काकडे व बापू गोवंडे यांना बेकायदेशीर मार्गाने विश्वस्त म्हणून घोषित केले. मात्र, नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी रॉबर्ट गायकवाडचे सर्व अर्ज फेटाळले. गायकवाडने नगरच्या न्यायालयात त्यावर अपील केले. न्यायालयाने मात्र सहायक धर्मादाय आयुक्तांचा निकाल रद्द ठरवला. त्याविरोधात अध्यक्ष भालेराव यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर न्यायालयाने 17 जानेवारी 2013 रोजी जिल्हा न्यायालयाचा निकाल रद्द करीत सहायक धर्मादाय आयुक्तांचा निकाल कायम केला. या निकालाविरुद्ध गायकवाडने पुन्हा अपील केले, पण उच्च न्यायालयाने 21 फेब्रुवारीला आपला 17 तारखेचा निकाल कायम केला असल्याचे रेव्हरंड वाघमोडे यांनी सांगितले.