आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरमली समाजातील 40 कुटुंब जातपंचायतीकडून बहिष्कृत, जातपंचायतीतील 26 जणांविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तिरमली समाजाच्या जातपंचायतीच्या पंचांनी जातीतून बहिष्कृत केले. पुन्हा जातीत परत घेण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यास जातीबाहेर काढण्याची धमकी दिली. वेळोवेळी तक्रारी केल्याने जीवे मारण्याचीही धमकी दिली, अशी फिर्याद नगर तालुक्यातील एका पीडित कुटुंबाने पोलिसांत दिली आहे.
 
त्यावरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण २६ जणांना आरोपी करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समिती बहिष्कृत केलेल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
शुक्रवारी सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवून घेतला. सहायक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास नगर तालुका पोलिस करीत अाहेत. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध यापूर्वीही जिल्ह्यात ठिकठिकाणी खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा रंजना गवांदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे नगर तालुका पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गंगा तुकाराम फुलमाळी, संजय गंगा फुलमाळी, शिवराम गंगा भिंगारे (तिघे रा. भेंडा फॅक्टरी, नेवासे), उत्तम हणुमंत फुलमाळी, लक्ष्मण हनुमंत फुलमाळी (दोघे रा. जेऊर हैबती, नेवासे), सुभाष बाळू फुलमाळी (शिंगणापूर), उत्तम दौलत फुलमाळी (पाथरवाला), तात्या शिवराम गायकवाड, रावसाहेब तात्या गायकवाड, साहेबराव रंगनाथ उंबरे, उत्तम रंगनाथ उंबरे (चौघे रा. ढोरजळगाव), शेतीबा राणा काकडे, गुलाब शेटिबा काकडे (रा. वाळकी, नगर), गंगा वेंकट मले, साहिबा महादू काकडे, रामा शिवराम फुलमाळी, बापू वेंकट फुलमाळी (ढोकराई, जोगीवस्ती, श्रीगोंदा), भीमागोपाळ गायकवाड (जवळा, पारनेर), रामा साहेबा फुलमाळी, शिशापा माणिक काकडे, साहेबराव माणिक काकडे (तिघे रा. ओझर, जुन्नर, पुणे), आण्णा बापू फुलमाळी (झापवाडी, जुन्नर, पुणे), साहेबा रावजी काकडे (भातोडी, नगर), रामा बाबू काकडे, सुभाष गंगा मले (दोघे रा. ढोकराई, श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत.
 
आरोपींनी पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर, बीड जिल्ह्यातील आष्टी येथे वेळोवेळी बेकायदेशीर जातपंचायतीचे आयोजन केले. या जातपंचायतीमध्ये तिरमली समाजाच्या बाबूराव साहेबराव फुलमाळी (वय ३५, रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) याच्यासह ४० कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केले. या सर्व कुटुंबांकडून प्रत्येकी हजार, याप्रमाणे एकूण ८० हजार रुपये घेऊन खंडणी वसूल केली. बाबुराव याने जातपंचायतीला विरोध केला म्हणून १६ जुलैला नगर तालुक्यातील गारमाळा येथील तिरमली वस्तीवर झालेल्या सभेत त्याला त्याच्या भावंडांना जातीतून बहिष्कृत केले. त्यामुळे बाबुरावने अखेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचे ठरवले. या गुन्ह्याचा अधिक तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे फौजदार नेरकर हे करीत आहेत.
 
आरोपींवर यापूर्वीही गुन्हे
नगरतालुका पोलिस ठाण्यात तिरमली समाजाच्या जातपंचायतीच्या २६ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नव्यानेच आलेल्या सामाजिक बहिष्कृतता विरोधी कायदा, खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, आदी कायदा कलमांन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यातील बहुतांश आरोपींवर जातीतून बहिष्कृत करत खंडणी मागण्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. त्यांच्यावर श्रीगोंदा, संगमनेर, शिर्डी, राहुरी, आदी पोलिस ठाण्यांमध्ये खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
 
जातपंचायतीला राजाश्रय
नगरजिल्ह्यात तिरमली समाजाची जातपंचायत भरल्याची बाब ‘दै. दिव्य मराठी’ने सर्वप्रथम उजेडात आणली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही जातपंचायत उधळून लावली. नगर जिल्ह्यात जातपंचायत भरवायला अडचण येते म्हणून आरोपींनी नंतर परजिल्ह्यात जातपंचायतीचे आयोजन केले. बीड जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा आश्रय जातपंचायतीच्या लोकांनी घेतला. या राजकीय नेत्याच्या बंगल्यातच एकदा जातपंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पीडित कुटुंबीय जातपंचायतीच्या पंचांमध्ये चांगलाच राडा झाला होता.
बातम्या आणखी आहेत...