आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर तालुक्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कायम दुष्काळात होरपळणार्‍या नगर तालुक्यावर यावर्षी पुन्हा दुष्काळाचे सावट पसरण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर तालुक्यात 36 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल सात हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे खरिपाचे क्षेत्रही वाढले होते. समाधानकारक झालेल्या पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईची झळ निर्माण होणार नाही, असे वाटत होते. मात्र, चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने पुन्हा तोंड वर काढले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात अवघे 20 टँकर सुरू होते.

एप्रिल महिना सुरू होताच जिल्ह्यात टँकरच्या संख्येत वाढ होऊ लागली. वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या नगर तालुक्यालाही यंदाही दुष्काळाच्या झळा बसण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्यापासून पाथर्डी व शेवगाव तालुक्यासह नगर तालुक्यातूनही पाण्याच्या टँकरला मागणी वाढत आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागातही तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात टँकरची संख्या 70 होती. आठ दिवसांपूर्वी टँकरची संख्या 165 होती. शुक्रवारी (23 मे) ही संख्या 189 वर पोहोचली आहे. नगर तालुक्यात 36 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
संगमनेर, कोपरगाव, राहाता, अकोले या बागायती भाग असलेल्या तालुक्यातही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी 13 मे अखेरपर्यंत जिल्ह्यात 137 गावांना 115 टँकर व 12 बैलगाड्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.