आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यांमुळे डोंगरगणची शेती बारमाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुक्यातील डोंगरगण भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. मात्र, अलीकडच्या दोन वर्षांत शेतकर्‍यांनी शेततळी बांधून सुमारे 700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. प्रगत तंत्रज्ञानाची कास धरून शेतात नवीन उपक्रम राबवण्याचा मानस तेथील शेतकर्‍यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना रविवारी व्यक्त केला.

डोंगरगण हे अवघ्या 1 हजार 347 लोकवस्तीचे गाव. डोंगराळ भाग असल्याने जमीन मुरमाड. त्यातच पाण्याचे दुर्भिक्ष. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच गावाचे अर्थकारण अवलंबून होते. याला पर्याय म्हणून शेतकर्‍यांनी जवळच्या तलावातील गाळ काढून जमिनीत टाकला. त्यामुळे जमिनी सुपीक झाल्या. शेती बारमाही बागायती करण्यासाठी 30 शेततळी बांधण्यात आली. डोंगरउतारावर शेततळी असल्याने नैसर्गिक दाबाने पाणी शेतापर्यंत पोहोचते. शेतकर्‍यांनी ज्वारी, बाजरीबरोबरच कांदा पिकवण्याला प्राधान्य दिले. दरवर्षी 150 हेक्टर क्षेत्रावर कांदा उत्पादन घेतले जाते. चांगला भाव मिळेपर्यंत कांदा साठवून ठेवता यावा यासाठी शेतकर्‍यांनी कांदाचाळी उभारल्या आहेत. पारंपरिक शेतीतून प्रगत शेतीकडे गावाची वाटचाल सुरू आहे. नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकरी राज्यातील विविध भागात दौरे काढतात अन् तेथील प्रयोगांची अंमलबजावणीही करतात. डोंगरगणच्या माळरानावर आता डाळिंब, सीताफळ व संत्र्याच्या बागा फुलल्या आहेत. पॉलिहाऊस दिसू लागली आहेत. जिल्ह्यात दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असताना या गावात अपवाद वगळता कोठेही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. प्रगतिशील शेतकरी रावसाहेब आढाव यांनी सुमारे अडीच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. या तलावामुळे त्यांची दहा एकर शेती बागायती झाली. राधाकृष्ण भुतकर यांनी फुलशेतीसाठी पॉलिहाऊस उभारले आहे. ठिबक सिंचन व तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा डोंगरगणकरांचा प्रयत्न आहे.

छावणीची गरज भासली नाही
डोंगरगणचे शेतकरी आता यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. शेततळ्यांमुळे संपूर्ण गावच बारमाही बागायतीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे चारा व पाणीटंचाईवर मात करण्यात गावकरी यशस्वी झाले आहेत. दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असताना डोंगरगणमध्ये जनावरांच्या छावणीची गरज भासली नाही. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठीदेखील गावाचा प्रयत्न आहे.

रोहयोची गरज नाही
सन 2003 च्या दुष्काळात गावातून सुमारे 500 मजूर रोजगार हमीच्या कामावर गेले होते, परंतु आता शेती बागायती झाल्याने शेतकरी स्वयंपूर्ण झाला आहे. त्यामुळे कोणालाही रोहयोच्या कामावर जाण्याची गरज भासली नाही. गावात आणखी बंधारे बांधण्याचा मानस असून पावसाचे पाणी वाया जाऊ द्यायचे नाही, असा आमचा निर्धार आहे.’’ कैलास पटारे, प्रगतिशील शेतकरी

फुलशेतीतून 5 लाख
‘जरबेरा’ फुलशेतीसाठी 20 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभारले आहे. या शेतीतून दरमहा 45 हजार याप्रमाणे वार्षिक सुमारे पाच लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. खर्च वजा जाता सुमारे 3 लाख रुपये निव्वळ नफा होईल. त्यामुळे इतर क्षेत्रातही पॉलिहाऊस उभारून विविध पिके घेण्याचा मानस आहे. याबाबत शेतकर्‍यांना मार्गदश्रन केले जात आहे. ’’ राधाकृष्ण भुतकर, प्रगतिशील शेतकरी