आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेडच्या शेतकर्‍यांचे तीन तास ठिय्या आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी व खरातवाडी परिसरातील खडीक्रशरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी कारवाई करून भविष्यात परवाना देणार नसल्याचे आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. एम. फुलसे यांनी दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी व खरातवाडी परिसरात पाच अवैध खडीक्रशर आहेत. धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असून शेती नापीक होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे क्रशर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही एका क्रशरच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी सोमवारी लोकशाही दिनात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर या शेतकर्‍यांनी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडे मोर्चा वळवला. अवैध खडीक्रशरवर कारवाई करून बंद करण्याची मागणी करत या आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या मारला. क्षेत्र अधिकारी बी. एस. हडबे यांनी आंदोलकांशी चर्चा करून यासंदर्भात नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयाला कारवाईचे अधिकार असल्याची माहिती दिली व त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

प्रादेशिक अधिकारी फुलसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून तसे ई-मेल आंदोलकांना पाठवला. जिल्हा उपप्रमुख मधुकर राळेभात, शहाजी पाटील, संताराम सूळ, कांतीलाल महानवर, कांतीलाल खरात, भाऊसाहेब बंडगर, प्रभू खरात, भाऊ सूळ, दादा इरकर, रमल कोळेकर, सयाजी खरात, संजय खरात यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.