आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी वळताहेत जैविक शेतीकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रासायनिक खतांचा बेसुमार वापर व अतिसिंचनाने जिल्ह्यातील जमिनींचा पोत घसरत असताना काही शेतकरी जैविक शेतीकडे वळत असल्याचे आशादायक चित्र आहे. सेंद्रिय खतांसोबत हानिकारक बुरशीचा नाश करणारे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक व व्हर्टिसिलियम या जैविक किडनाशकाच्या वापराकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. वर्षभरात जिल्ह्यातील दहा हजार शेतक-यांनी याचा उपयोग केला. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत तयार होणारी बुरशी व कीड नियंत्रक अन्य आठ जिल्ह्यांत जात आहे.

जमिनींचा पोत सुधारून उत्पादनवाढीसाठी शेतीत जैविक खतांचा वापर करणे आता आवश्यक ठरत आहे. ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी पिकांसाठी हानिकारक असणा-या घातक बुरशींवर उपजीविका करते. पिकांसाठी हानिकारक बुरशीमध्ये स्क्लारोशियम, रायझोक्टोनिया, पिथिमय, फ्युजरियम या बुरशीचा समावेश आहे. ट्रायकोडर्मा या औषधी बुरशींची घातक बुरशीपेक्षा जलद गतीने वाढ होते. तसेच यातून ग्लिओटॉक्सीन आणि व्हिरीडी नावाचे दोन विषारी द्रव तयार होतात. त्यांचा हानिकारक बुरशीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. रसशोषण करणा-या किडीचा नायनाट करण्यात मोलाची भूमिका ट्रायकोडर्मा बजावते. डाळवर्गीय व तेलबिया यांच्या बीजप्रक्रिया व भाजीपाला रोपवाटिकेत बुरशीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर होतो.

येथील प्रयोगशाळा 2005-06 पासून कार्यरत आहे. प्रयोगशाळेत दरवर्षी सरासरी 25 टन ट्रायकोडर्माचे उत्पादन करण्यात होते. नगरसह, सोलापूर, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील शेतकरी येथून ट्रायकोडर्मा आगाऊ नोंदणी करून विकत घेतात. ट्रायकोडर्मा प्रति किलो 69 रुपये, तर व्हर्टिसिलियम 138 रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध आहे. गेल्यावर्षी 38 टन ट्रायकोडर्माची व एक टन व्हर्टिसिलियमची विक्री करण्यात आली. दहा हजार शेतक-यांनी 2 हजार हेक्टर क्षेत्रांवर त्याचा वापर केला. यावर्षी एप्रिल ते जूनअखेर या प्रयोगशाळेत 10.50 टन ट्रायकोडर्माचे उत्पादन करण्यात झाले. या जैविक उपाययोजना करणा-यांमध्ये जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खासगी कंपन्यांकडूनही जैविक बुरशी व कीडनाशकांचे उत्पादन होते. मात्र, शासकीय प्रयोगशाळेत तयार होणा-या या जैविक उपायांचा दर्जा अधिक चांगला व तुलनेने किंमत निम्म्यापेक्षा कमी आहे. उत्पादनवाढीत साहाय्यभूत व जमिनीचा पोत कायम ठेवण्यास मदत करणा-या जैविक औषधांकडे शेतक-यांचा वाढता कल आशादायी ठरत आहे.

शेतक-यांचा चांगला प्रतिसाद
- फळबागा, भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रामुख्याने ट्रायकोडर्माचा वापर करतात. ट्रायकोडर्माने उत्पन्नात मोठी वाढ होते. नगरसह ठाणे, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यांतील शेतक-यांनी ट्रायकोडर्माचा फायदा झाल्याचे अभिप्राय नोंदवले.’’ आर. जी. खांदवे, तंत्र अधिकारी, जैविक प्रयोगशाळा, नगर.

या पिकांसाठी वापर आवश्यक
तूर, हरभरा, कापूस, मूग, उडीद, चवळी, घेवडा, वाटाणा, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबिन, कापूस या पिकांतील मर व मूळकुज रोखण्यासाठी बीजप्रक्रियेसाठी लाभदायक. कोबी, वांगी, टोमॅटो, मिरची, फुलकोबी, काकडी आदी भाजीपाला, हळद, आले, पानवेल, केळी, डाळिंब, मोसंबी, ऊस पिकांसाठी लाभदायक . बीजप्रक्रिया, सॉईल आप्लिकेशन, फवारणीसही ट्रायकोडर्माचा उपयोग होतो.

ट्रायकोडर्माचे फायदे
जमिनीत मूळकुज व सूत्रकृमिला बळी पडणा-या पिकांसाठी ट्रायकोडर्मा उपकारक आहे. प्रतिहेक्टरी 20 किलो या प्रमाणात वापर करावा. मर, कंदकुज, खोडकुज व सर्व फळबागांसाठी उपयुक्त आहे. सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेस मदत, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी उपयोगी बुरशी तयार करते. हानिकारक बुरशीला होणारा अन्नपुरवठा कमी करून त्यावर नियंत्रण मिळवते.

डाळिंबाचे शंभर टक्के रोपे जगली
- ट्रायकोडर्मा, व्हरीडीच्या वापरासह तीन महिन्यांपूर्वी लागवड केलेली डाळिंबाची रोपे शंभर टक्के जिवंत राहिले. सेंद्रिय खते व ट्रायकोडर्माच्या वापराने माळरानावरही डाळिंब बाग जोमाने वाढत आहे. त्यामुळे समाधान वाटले.’’ कृष्णा जगदाळे, शेतकरी, गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे.