आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाला योग्य भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये समाधान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - भारतीय कापूस निगमचे (सीसीआय) कापूस खरेदी केंद्र शेवगावात उशिरा सुरू झाले असले तरी शेतक-यांच्या कापसाला योग्य भाव मिळू लागल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सिद्धिविनायक जिनिंग प्रेसिंग आवारात 13 जानेवारी रोजी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी या केंद्रात सव्वाशे क्विंटल कापसाची खरेदी करून 4 हजार 151 रुपये भाव देऊन मंगळवार अखेरपर्यंत 4 हजार 240 रुपये भाव दिला आहे. सीसीआयने शेतक-यांना चांगला भाव दिल्याने तालुक्यातील खासगी अन्य आठ जिनिंग प्रेसिंग तसेच खासगी कापूस खरेदी केंद्रावर पूर्वी कापसाला 3700 रुपये भाव मिळत होता आता 4200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तालुक्यात प्रारंभी खासगी व्यापा-यांनी कापसाची खरेदी 4 हजार 500 रुपयांनी सुरू केली होती. त्यानंतर अखेरीस ही खरेदी 3700 रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी सीसीआय कापूस खरेदी केंद्राची वाट पाहत होते. गेल्या वर्षभरापासून शेतक-यांची कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होती. या मागणीसाठी जनशक्ती मंच, भारतीय टायगर फोर्स, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरणे, मोर्चा, रास्ता-रोको आंदोलन केले होते. दोन महिन्यांपूर्वी माकपने केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी आठ दिवसांत सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर शेवगावात कापूस खरेदी केंद्र सुरू झाले.
हमीमुळे नफ्यात वाढ - सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू होताच भावात फरक पडला आहे. शासकीय हमी असल्याने नफा वाढला तर शेतक-यांचा फायदा होतो. सीसीआय खरेदी केंद्र सुरुवातीपासूनच तयार होणे गरजेचे होते’’- भाऊसाहेब पायघन, तालुका कृषी अधिकारी
कापूस उत्पादक शेतक-यांना क्विंटलला 5 हजारांची अपेक्षा - शेतक-यांना आजही 5 हजार प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. शेतकरी भावाबाबत विचलित आहेत. दिवाळीत साखर कारखान्याकडून उसाचे पैसे मिळाल्याने आताही शेतक-यांकडे 60 टक्के कापूस शिल्लक आहे. चांगल्या प्रतीचा कापूस शेतक-यांनी साठा करून ठेवलेला आहे. त्यामुळे शेतक-यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे.’’ * महिंद्रसिंग पवार, केंद्रप्रमुख, सीसीआय, शेवगाव