आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूग, उडीद तर गेलाच; आता खरीपही धोक्यात; जूनअखेर केवळ अर्धा टक्के पेरण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जून संपत आला, तरी जिह्यात सरासरी अवघा 19 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ अर्धा टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. कडधान्यांमध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र असणारे मुगाचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले असून खरीप हंगामच धोक्यात आला आहे.
सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर जिल्ह्यात गेल्यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावली. मात्र, यावर्षी पुन्हा दडी मारली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांच्या नशिबी आतापर्यंत निराशाच पडली आहे.

जिल्ह्यात कडधान्यांत मुगाचे सर्वाधिक क्षेत्र असते. त्यानंतर तूर व उडीद असा उतरता क्रम आहे. सुमारे 13 हजार 390 हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी होते. मात्र, यंदा अवघ्या पंचवीस हेक्टर क्षेत्रात मुगाची पेरणी होऊ शकली. पावसाभावी ही पेरणीही वाया जाणार आहे. तूर व उडदाचे क्षेत्र अनुक्रमे 12 हजार 20 व 7 हजार 800 हेक्टर आहे. उडीद व तूर या कडधान्यांची पेरणीच यावर्षी अद्याप झालेली नाही. जूनअखेर पाऊस येणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी मुगाचे पीक शेतकर्‍यांच्या हाती लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ऊस वगळता खरिपाचे क्षेत्र 4 लाख 12 हजार 230 हेक्टर आहे. यापैकी केवळ 1 हजार 17 हेक्टर क्षेत्रात आतापर्यंत पेरणी झाली. मूग व कपाशीचा यात समावेश असून एक हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे.

मान्सूनचा पाऊस उशिराने आल्यास निर्माण होणार्‍या आपत्कालीन स्थितीत कोणते पीक घ्यावे, याबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारशी केल्या आहेत. 25 जूननंतर मूग व उडदाची पेरणी करू नका, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरेदी केलेले मूग व उडदाचे बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. उत्पादनाअभावी कडधान्यांचे भावही वधारणार आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 497 मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्यावर्षी जूनअखेर शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यावर्षी आतापर्यंत अवघा 19 मिलिमीटर पाऊस झाला आहे. उशिराच्या पेरणीमुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.
उशिरा पेरणीमुळे उत्पादकतेवर परिणाम
मोसमी पावसाने मागील आठ दिवसांपासून दडी मारल्याने पेरण्या लांबल्या आहेत. उशिरा पेरणी झाल्यास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे. 15 जुलैनंतर सूर्यफूल, एरंडी किंवा चारापिकांचा पर्याय आहे. तसेच बाजरीही घेता येईल. मात्र, उत्पादनात घट निश्चित आहे. शेतकर्‍यांनी जिल्ह्यासाठी सुचवण्यात आलेल्या आपत्कालीन पीक नियोजनानुसार आखणी करणे आवश्यक आहे.’’
संभाजी गायकवाड, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, नगर.
आपत्कालीन पीक नियोजन असे करा...
जूनचा दुसरा पंधरवडा : विद्यापीठाने शिफारस केलेली सर्व पिके घेता येतील.
जुलैचा पहिला पंधरवडा :बाजरी, भुईमूग, तूर, सूर्यफूल, एरंडी, हुलगा, राळा.
जुलैचा दुसरा पंधरवडा : सूर्यफूल, तूर, बाजरी, एरंडी, हुलगा, राळा, गवार.
आॅगस्टचा पहिला पंधरवडा : सूर्यफूल, तूर, हुलगा, एरंडी, मका व चारापिके.
आॅगस्टचा दुसरा पंधरवडा : सूर्यफूल, तूर, एरंडी व सर्व चारा पिकेच घ्यावीत.
सप्टेंबरचा पहिला पंधरवडा : रब्बी ज्वारी, मका पिकासह सर्व चारापिके.
(25 जूननंतर मूग व उडदाची पेरणी टाळणे आवश्यक आहे.)