आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी : ‘कोरडवाहू’वर अन्याय करणारा निर्णय मागे घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - निळवंडे धरणाचे कालवे तयार होण्यापूर्वीच जलसंपदा विभागाने शेतक-यांना मागणीप्रमाणे उपसा सिंचनाच्या मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. जलसंपदाच्या या निर्णयामुळे तळेगाव, निमोण भागातील लाभधारक शेतक-यांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कोरडवाहू भागावर अन्याय करणारा हा निर्णय जलसंपदाने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
निळवंडे धरणाचे कालवे तळेगाव, निमोण गटातील गावातून जाणार आहेत. ते जिरायती भागाला वरदान ठरणार असल्याने या गावांना निळवंडे धरण व कालव्याची प्रतीक्षा आहे.

धरणाचे काम प्रगतिपथावर असले, तरी कालव्यांची कामे मात्र अद्याप सुरू झालेली नाहीत. अनेकवेळा आश्वासनेच पदरी पडलेल्या या भागातील शेतक-यांनी आता शासनाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील शेतक-यांचा समान हक्क असताना कालव्यांची निर्मिती होण्यापूर्वीच जलसंपदा विभागाने वरच्या भागातील शेतक-यांना उपसा जलसिंचनाची परवानगी देत जिरायती पट्ट्यातील शेतक-यांच्या भावनांशी खेळण्याचे काम चालवल्याचा आरोप शरद गोर्डे, रावसाहेब दिघे, भास्कर सोनवणे, शिवाजी पोकळे, संतोष तारगे, चंद्रकांत कार्ले, भानुदास सुपेकर आदींनी केला आहे. हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी या शेतक-यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

विषय संवेदनशील...
निमोण, तळेगाव गट पाण्याअभावी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त असताना टँकरच्या पाण्यावर फळबागा जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता टँकरचे पाणीही मिळेनासे झाले. त्यामुळे बागा जगवण्याचे आव्हान आहे. यावर्षी उत्पादन हाती आले नाही, तर शेतक-यांना कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. धरणाच्या कालव्यांची कामे पूर्वीच झाली असती, तर या भागाला दिलासा मिळाला असता. आता मात्र कालव्यांचा विषय या भागातील शेतक-यांसाठी संवेदनशील बनला आहे.

...तर तीव्र आंदोलन
- धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील शेतक-यांचा समान हक्क असावा. अद्याप धरणाचे काम पूर्ण नाही, कालव्यांची कामे कशी करायची याचा संभ्रम असताना जलसंपदाच्या निर्णयाचा फायदा केवळ वरच्या भागातील शेतक-यांना होणार आहे. जिरायती पट्ट्यात असंतोष निर्माण होईल. हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारू.’’ शरद गोर्डे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.