आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या प्रवेशद्वाराला शेतकर्‍याने टाळे ठोकले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर - शेतात अतिक्रमण करून न्यायालयाची इमारत बांधण्यात आल्याचा आरोप करत बदनापूर येथील शेतकर्‍याने बुधवारी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. अकबर खान पठाण असे या शेतकर्‍याचे नाव असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

सकाळी 10 वाजता कोर्टाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याचे शिपायाच्या लक्षात आले. त्याने न्यायालयाचे सहायक अधीक्षक नागनाथ केंद्रे यांना प्रकार कळवला. केंद्रे यांनी खान यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वाद घातला. घटना कळताच पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी न्यायालयात येऊन कुलूप तोडले व अकबर खान यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी केंद्रे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

खान हे आपल्याकडे न्यायालयाचा मनाई हुकूम असल्याचे सांगत असले तरी त्यांनी त्याबाबतची कागदपत्रे दाखवली नाहीत. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर केले जाईल, असे इन्स्पेक्टर चंद्रमोरे म्हणाले.

इमारत अनधिकृत
गट नंबर 189, सर्व्हे नंबर 120मध्ये 10 एकर जागा माझ्या नावे आहे. येथे कोर्ट बांधण्यात आले. अतिक्रमण करून पोलिसांसाठी घरे सुरू आहेत. कोर्टाचा मनाई हुकूम असताना हे अतिक्रमण काढले जात नाही.’ अकबर खान, शेतकरी