आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Ministe Radhakrishna Vikhe's Comment On MLA Anil Rathore

‘त्यांच्या’ भानगडींची यादीच माझ्याकडे...; प्रचारसभेत मंत्री विखे यांचा टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आमदाराकडून शहरात झालेले एखादे तरी चांगले काम दाखवा अन् माझ्याकडून हजार रुपये मिळवा, असे सांगत आमदारांच्या अनेक भानगडींची यादीच माझ्याकडे आहे. त्यांनी खंडणी बहाद्दरांच्या टोळ्या गोळा करून तुंबड्या भरल्या, अशी टीका कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अनिल राठोड यांना नाव न घेता केली.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. रविवारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विशाल गणपती मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली. नंतर प्रचारसभेत विखे बोलत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते, डॉ. सुधीर तांबे व अरुण जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, शंकरराव घुले, अँड. शारदा लगड, विनायक देशमुख या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, आमच्याकडे कुठेही बंडखोरी झाली नाही. सर्व जागांवर आम्ही उमेदवार दिले. भाजप-शिवसेनेला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत. बाळासाहेब बोराटे बिनविरोध निवडून आले हा शुभशकुन आहे.
आमदाराच्या माध्यमातून शहरातील लोकांसाठी झालेले एखादे तरी चांगले काम दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असे आव्हान देत विखे म्हणाले, आमदारांनी अनेक भानगडी केल्या आहेत. त्याची यादीच माझ्याकडे आहे. जातीय दंगे घडवण्याचे मोठे काम त्यांनी केले. शहरात खंडणीबहाद्दरांच्या टोळ्या तयार झाल्या असून राजकीय तुंबड्या भरण्याचा धंदा सुरू आहे. यांच्यापासून शहर वाचवायचे असेल, तर आघाडीशिवाय शहराला पर्याय नाही. आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. त्याबरोबरच त्यांच्या जाहीरनाम्याचाही पंचनामा करू.
थोरात म्हणाले, 25 वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांच्या काळात कोणतेही विकासकाम झाले नाही. त्यांनी फक्त माणसा-माणसात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. काँग्रेस आघाडीसाठी शहरात चांगले वातावरण आहे. पुढील पाच वर्षांत शहरातील विकास ठरवणारे मतदान या वेळी होणार आहे.
पाडापाडीचे राजकारण नको
शहरात मोठय़ा प्रमाणात गट-तट आणि गुंडगिरी सुरू आहे. मी पालकमंत्री असताना 108 कोटींची गटार योजना मंजूर केली, पण यांच्याकडून काम झाले नाही. उड्डाणपूल रखडला आहे, वाहनतळ नाही अशा अनेक समस्या आहेत. त्यांच्यात सुरू असलेले पाडापाडीचे राजकारण त्यांनाच करू द्या, आपल्याला पाडापाडी करायची नाही.
-बबनराव पाचपुते, आमदार
अर्बन बँक कोणी बुडवली ?
नगरकरांना नागरी सुविधा मिळायला हव्यात. आपल्या सर्वांना अल्पसंख्याकांनाही निर्भयपणे पुढे घेऊन जायचे आहे. मी मुंबई, तसेच पिंपरी चिंचवड महापालिका पाहिल्या. तसाच बदल नगर महापालिकेतही घडवायचा आहे. येथील अर्बन बँकेला 100 वर्षांची परंपरा आहे. ही बँक कोणी बुडवली, याचा विचार व्हायला हवा.
- मधुकर पिचड, पालकमंत्री
युतीमध्ये टोकाचा द्वेष
भाजप व शिवसेनेमध्ये टोकाचा द्वेष पाहायला मिळतो आहे. अनेक वर्षे भ्रष्टाचाराचा अन् बेशिस्तीचा कारभार येथे झाला. माजी महापौर संदीप कोतकर व संग्राम जगताप यांच्या कार्यकाळात शहरात काही चांगली कामे झाली.
- डॉ. सुधीर तांबे, आमदार