आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन : खरवंडी कासार येथे शेतक-यांचा रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - ऊसतोडणी मजुरांच्या मजुरीत वाढ करावी, दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थ्यांना फी माफ करावी, खरवंडी कासार-भगवानगड रस्त्याचे चौपदरीकरण करावे, भारजवाडी रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा, जनावरांच्या छावण्या त्वरित सुरू करून शेतक-यांना मोफत बियाणे पुरवावे आदी मागण्यासांठी खरवंडी कासार येथे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व उद्योजक भीमराव फुंदे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिनकर पालवे, ऊस तोडणी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गहिनीनाथ थोरे, महादेव दराडे, राजेंद्र दगडखैरं, दिगंबर सोलाट, महारुद्र कीर्तने आदींनी केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन झाल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. खासगी वाहनचालक व आंदोलकांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक चकमकी पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवल्या.

यावेळी उद्योजक फुंदे म्हणाले, पीकविम्याची मुदत वाढवून मिळणे अत्यावश्यक झाले आहे. ब-याच शेतक-यांच्या पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत. काही भागात झाल्या, त्या वाया गेल्या आहेत. शासनाने मोफत बियाणे पुरवून कर्जवसुली पूर्णपणे थांबवावी, शाळा कॉलेजमधून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी होऊन मोफत प्रवेश देण्यात यावा. टँकरची टंचाई असल्याने पाणी टंचाईच्या तीव्रतेत आणखी वाढ होत आहे. येत्या आठ दिवसांत जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात येऊन शेतक-यांकडील पशुधन वाचवावे, सर्वत्र महागाई वाढल्याने ऊसतोडणीचे दर दुपटीने वाढून मिळावेत, साखरेची भाववाढ झाल्याने साखर कारखानदारांनी तोडणी मजुरांना दरवाढ देऊन थकीत पेमेंट अदा करावे. तालुक्यात सुमारे 60 हजार कामगार दुष्काळाच्या झळामध्ये होरपळून निघत आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी विशेष पॅकेज देऊन दारिद्र्यरेषेची कार्डे द्यावीत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर दुपटीने धान्य मिळून साखर व तेल व जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, आदी मागण्या फुंदे यांनी यावेळी केल्या. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाला 15 दिवसांची डेडलाईन
तहसीलदार सुभाष भाटे यांनी आंदोलकांशी चर्चा करून समाधानकारक आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 दिवसांची मुदत आंदोलकांनी दिली; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला .