आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटपाण्यास विलंब झाल्याने पिकांचे नुकसान,शेतकरी वर्ग चिंतेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासेफाटा- विहिरींतील पाण्याने गेल्या महिन्यातच तळ गाठल्याने भेंडे (ता. नेवासे) परिसरातील उभी शेतपिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. पाटपाणी शेतात पोहोचेपर्यंत पिके माना टाकणार असून, त्याचा सर्वाधिक फटका उसाच्या पिकांना बसणार असल्याने परिणामी ऊस गाळपात सरासरी उतारा घसरणार आहे. कापूस व बाजरीच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरीवर्गात हतबलता आहे.
पाटपाण्याचे आवर्तन सुटलेले असले, तरी भेंडे, सौंदाळे, देवगाव, तरवडी, देडगाव, तेलकुडगाव, गेवराई, शहापूर, भानसहिवरे, पिंप्रीशहाली, देवसडे, नजीक चिंचोली, जेऊर हैबती, पाथरवाले, चिलेखनवाडी, कौठा नांदूर, सुकळी, वडुले, अंतरवाली, नागापूर, खुणेगाव आदी गावांच्या शिवारात पाटपाणी येण्यापूर्वीच शेतपिके पाण्याअभावी होरपळल्याने शेतक-यांना नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कापसाला, तर एकीकडे रोगकिडीने त्रस्त केले असताना दुसरीकडे पाण्याचा फटका बसल्याने कापसाच्या उत्पन्नात घट होणार आहे. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच भूजल पातळी खालावल्याने शेतपिकांना पाटपाण्याचा आधार वाटू लागला. पण, पाटपाण्यासही आता उशीर झाला असून पाटपाणी शेतात येईपर्यंत, तर पिके पूर्णपणे जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वाधिक हानी ऊस पिकांची होणार आहे. ऊस पिकाला वेळेत पाणी न मिळाल्यास ऊस गळितात साखर उताऱ्यात कमालीची घट येते. परिणामी साखर कारखान्याबरोबरच शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान होते. खालावलेली भूजल पातळी, विजेचा लपंडाव, उन्हाची वाढलेली तीव्रता व पाटपाण्यास विलंब यामुळे उभ्या शेतपिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कमी पावसामुळे नेवासेसह जिल्ह्यात खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले होते. यंदा मात्र जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.आता मात्र पाटपाण्यास विलंब झाल्याने चिंता वाढली आहे.
पिके जळू लागली...
पिके पाण्याअभावी जळत असून आता पाटपाण्याचा काहीही उपयोग पिकांना होणार नाही. आठ-दहा दिवसांपूर्वीच पिकांना पाटपाण्याची आवश्यकता असताना ते मिळाले नाही. विहिरीत पाणी नसल्याने व पाटपाण्यास विलंब झाल्याने पिके जळाली.
बाळासाहेब साबळे, ऊसउत्पादक शेतकरी, भेंडा.
भरपाईची मागणी करू
बाजरीचे पीक हातातून गेले. ज्वारी रोपावस्थेतच कोमेजली. उसाची चिपाडे झाली. पाण्याअभावी पिकांची अशी अवस्था झाल्याने राज्य शासनाकडे शेतकऱ्यांच्या वतीने नुकसान भरपाईची मागणी तातडीने केली जाणार आहे. दिनकर गर्जे, तालुकाध्यक्ष, भाजप, नेवासे.