आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
श्रीगोंदे - तालुक्यातील शेतकरी फळबाग अनुदानाच्या दुसर्या हप्त्यापासून अद्याप वंचित आहेत. पहिला हप्ता मिळवतानादेखील शेतकर्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.
दुष्काळात होरपळलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी व फळबागा वाचवण्याकरिता राज्य सरकारने हेक्टरी तीस हजार रुपये अनुदान जाहीर केले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून राज्यभरातील शेतकर्यांना याचा फायदा झाला. दोन हप्त्यांत हे अनुदान देण्याची तरतूद आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पहिला हप्ता मिळणे अपेक्षित होते. बागा जगवण्याकरिता हे पैसे उपयोगी येतील, असे सरकारचे धोरण होते. मल्चिंग करणे, टँकरने पाणी विकत घेणे, ते साठवणे, बागांची छाटणी करणे आदी कामे याद्वारे करण्याचे आदेश होते.
मुळातच मे महिना संपल्यानंतर पहिला हप्ता तालुक्यातील शेतकर्यांना मिळाला. तेव्हाही जिल्ह्यातील इतर तालुक्यांना हे अनुदान लवकर मिळाले होते. पहिला हप्ता मिळवतानाही श्रीगोंदे तालुक्यातील शेतकरी जसे रडकुंडीला आले, त्याच पद्धतीने दुसरा हप्ता मिळवताना शेतकर्यांना रडण्याची वेळ आली आहे.
उन्हाळा संपला, पावसाळा सुरू होऊन दीड महिना होत आहे, तरीदेखील फळबाग अनुदानाचा दुसरा हप्ता शेतकर्यांच्या नावे जमा झालेला नाही. श्रीगोंदे कृषी विभागातून या संदर्भातील माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत वेळीच न पोहोचणे, नगर कार्यालयातून होणारी दप्तर दिरंगाई, तसेच ऑनलाइन पैसे जमा करण्याकरिता बँकांपर्यंत वेळेत याद्या न पोहोचणे आदी कारणांमुळे हा प्रकार घडत आहे, असा आरोप त्रस्त शेतकर्यांकडून होत आहे. श्रीगोंद्यासह अन्य काही तालुक्यांतील शेतकर्यांनाही दुसरा हप्ता मिळालेला नाही. अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी फळबागधारक शेतकर्यांतून होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.