आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers' Organizations,Latest News In Divya Marathi

जागा न मिळाल्यास बंडखोरी करणार; जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे- महायुतीकडून नेवाशाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात यावी; अन्यथा बंडखोरी करून राजेंद्र भंडारी निवडणूक लढवतील व त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी दिला. कुकाणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रचारप्रमुख प्रताप पटारे, युवक जिल्हाध्यक्ष सुधाकर होंडे, तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, रावसाहेब कावरे, शेषराव साबळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राजेंद्र भंडारी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली.
प्रस्थापितांविरोधी असलेला नेवासे तालुका हा धक्कादायक निकाल देतो. आम्ही गेली चार वर्षे शेतकरी व सामान्यांच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेऊन आवाज उठवला आहे. महायुतीच्या राज्य बैठकीत महायुतीचा आमदार नसलेल्या जागेवर शेतकरी संघटनेने उमेदवारी मागितलेली आहे. जिल्ह्यातून केवळ एकाच जागेसाठी आम्ही आग्रह धरलेला आहे. त्यामुळे ही जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

गेले पंधरा वर्षे तालुक्यात प्रस्थापितांविरोधात काम करणारे भंडारी हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना तालुक्यात प्रतिसाद मिळेल. त्यामुळे आम्ही या जागेवर उमेदवारी करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कोरडे यांनी स्पष्ट केले व प्रसंगी बंडखोरीदेखील करण्याचा इशारा दिला.
जिल्हा प्रचारप्रमुख प्रताप पटारे म्हणाले, राज्यात विधानसभेत शेतकरी संघटनेचे आमदार निवडून आणून दबावगट निर्माण झाल्याशिवाय शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातून चार जागा अपेक्षित आहेत. त्यापैकी नेवासे तालुक्यासाठी आम्ही आग्रही आहोत.
दरम्यान, तालुक्यात लवकरच खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत मोठ्या शेतकरी मेळाव्याचे नियोजन आहे. या मेळाव्यात खासदार शेट्टी भंडारी यांची उमेदवारी जाहीर करतील, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

...तर बंडखोरी करण्याची तयारी
तुकाराम गडाख व विठ्ठल लंघे यांच्याबरोबर काम केले. मात्र, त्यांनी प्रस्थापितांशी हातमिळवणी करून मतदारांचा विश्वासघात केला. मी तडजोड न करता शेतकरी व तालुक्याच्या हितासाठी मी निवडणूक लढणार आहे व निवडून येईल, अशी माझी खात्री आहे. उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बंडखोरीही करण्याची तयारी असल्याचेही भंडारी म्हणाले.