आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी रोखले चाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सुकाणू समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला नगर जिल्ह्यात सोमवारी मोठा प्रतिसाद िमळाला. नगर शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख चौकांत शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून चाक थांबवले. नगर शहरातील मार्केट यार्ड चौकात सुमारे अर्धा तास रास्ता रोको झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर संघर्ष सुरु आहे. शेतकरी संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देताना अनेक शर्ती अटी लागू केल्या. या जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचा आरोप सुकाणू समितीने केला. 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सोमवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शहरात सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतकऱ्यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. मार्केट यार्ड चौकात जिल्हा हमाल पंचायत, शेतकरी संघटना, मानवाधिकार आदी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. 

सरकारने दीड लाखापर्यंत कर्जमाफी देताना जटील अटी लादल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात अजून अनुदान पडलेले नाही. शेतकऱ्यांनी याबद्दल सरकारचा तीव्र निषेध केला. संतप्त आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केली. तथापि, समाधानकारक तोडगा निघत नसल्याने सुमारे अर्धा तास आंदोलन सुरू होते. यावेळी अजय महाराज बारस्कर, भैरवनाथ वाकळे, अॅड. सुभाष लांडे, जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे अशोक सब्बन, नाना कदम, बच्चू मोढवे, भैरवनाथ कोतकर, विकास गेरंगे, मानवाधिकार संघटनेच्या, संध्या मेढे आदी उपस्थित होते. 

कायदा सुव्यस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिस वाहनात आंदोलकांना कोंबून कोतवाली ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. दरम्यान, रास्ता रोको झाल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर थांबलेले चाक पुन्हा सुरळीत सुरू झाले. 
बातम्या आणखी आहेत...