आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आंदोलन छेडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यासह राज्यभरात पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे सरकारने शेतक-यांना तातडीने कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. १० जुलैला हे आंदोलन करण्यात येईल. मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पाटील म्हणाले, राज्यात दुबार पेरणीचे संकट असल्याने तातडीने रोजगार हमीची कामे सुरू करून हाताला काम जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याची गरज आहे. आम्ही सत्तेत असताना राज्यभरात साडेपाच हजार टँकर छावण्या सुरू केल्या होत्या. पण त्यावेळी सध्याइतकी भयावह परिस्थिती नव्हती. या दुष्काळी परिस्थितीबाबत काँग्रेस पक्ष आवाज उठवणार आहे. दुष्काळी परिस्थिती असताना कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. आम्ही जशी संपूर्ण कर्जमाफी दिली होती, तशीच कर्जमाफी आताच्या सरकारने द्यावी. शेतमालाचे घसरलेले भाव, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे आता कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठका झाल्या आहेत. त्यानुसार कर्जमाफीसाठी १० जुलै रोजी आम्ही राज्यात आंदोलन छेडणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

शेतक-याला ऊस, दूध, कापूस, धान, सोयाबिन आदीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, सध्या यापैकी कशालाच चांगला भाव मिळत नाही. यावर तातडीने मार्ग काढायला हवा. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे निदर्शने होत आहेत, आंदोलने केली जात आहेत. पण हिंसक मार्ग परवडणारा नाही, असे पाटील यांनी सांगितले. साखर कारखानदारां कडून शेतकऱ्यांचे पेमेंट देणे बाकी आहे. यासंदर्भात सहकार मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

परिस्थिती कोणतीही असो, सरकारची प्रशासनावर पकड असायला हवी, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र नागवडे, राजू पाटील, सुनील माने आदी उपस्थित होते.
शेतक-यांच्या कर्ज माफीसाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सद्यस्थिती पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय व्हावा, अशी सामान्य शेतकऱ्यांचीही इच्छा आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरूनही मोठा प्रतिसाद मिळणार आहे. हर्षवर्धन पाटील

हजार ३०० कोटींचे पेमेंट शेतक-यांना मिळणे बाकी
ऊसउत्पादक शेतक-यांना कारखान्यांकडून सुमारे हजार ३०० कोटी रुपयांचे पेमेंट येणे बाकी आहे. यासंदर्भात सहकारमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार आहे. यासाठी केंद्राचे राज्याचे पैसे एकत्र करून हे पेमेंट अदा करता येईल, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वर्षभरात साडेपंधरा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
आम्हीसत्तेत असताना सध्याचे मंत्री आत्महत्येवरून आघाडी सरकारवर ३०२ चे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होते. आता यांचे सरकार असताना वर्षभरात १५ हजार ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मग यांच्यावर ३०२ कलम लावायचे का ? असा सवालही माजी मंत्री पाटील यांनी केला.

४० हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात यावे
राज्यभरातील शेतक- यांच्या डोक्यावर सुमारे ४० हजार कोटींचे पीक कर्ज आहे. आम्ही सरकारला आकडा सांगायला तयार आहोत. पण आम्हाला कोणीही आकडा सांगितला नसतानाही आम्ही कर्जमाफी केली होती, असेही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.