आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीसाठी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, श्रीरामपूर येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - भरणे झाल्याशिवाय कालवा बंद करणार नाही, असे लेखी अाश्वासन देऊनही अधिकाऱ्यांनी कालवे बंद केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी साेमवारी श्रीरामपूरच्या पाटबंधारे कार्यालयात अात्मदहन करण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांनाही जाळून टाकण्याची धमकी त्यांनी दिली हाेती. दरम्यान,  पोलिस व नागरिकांनी  हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.  
 
गेल्या महिन्यापासून भंडारदरा धरणातून अावर्तन सुरू होते. सुरुवातीला पाटबंधारे खात्याने नेवासे भागात  पाणी सोडले. भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या दबावाखाली सात दिवस जादा कालवा सुरू ठेवला गेला, असा अाराेप परिसरातील शेतकऱ्यांमधून हाेत अाहे. त्यामुळे नेवाशाला तेरा दिवस पाणी गेले. त्यानंतर श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांना पाणी सुरू झाले. ४१० क्युसेक पाणी श्रीरामपूरसाठी हवे असताना  १०० क्युसेक पाणी कमी मिळत होते.  यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या, मात्र  पाणीवाटपात सुधारणा झाली नाही. वडाळा महादेव, मुठेवडगाव, भोकर येथील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेरावही घातला होता.

तेव्हा भरणे झाल्याशिवाय कालवा बंद करणार नाही, असे लेखी अाश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. रविवारी अचानक अावर्तन बंद करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले.  सोमवारी सकाळी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात अनेक शेतकरी घुसले. ‘पाणी द्या, नाहीतर अधिकाऱ्यांसह आम्ही  अंगावर पेट्रोल टाकून सामुदायिक आत्मदहन करू,’ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यामुळे भांबावलेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन मार्ग काढला.

खुर्ची पेटवण्याचा प्रयत्न  
अांदाेलक शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयातील खुर्ची पेटवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी हस्तक्षेप केला. शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कालवा बंद झाल्याने शेकडो एकर शेतीला पाणी मिळाले नाही. कडक उन्हामुळे पिके जळून चालली आहेत. अशा पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. अखेर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
 
बातम्या आणखी आहेत...