आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाचे डोळे पुन्हा आकाशाकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात खरिपाच्या 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु आठ दिवसांपासून पाथर्डी वगळता अन्यत्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जिल्ह्यात मंगळवार अखेरपर्यंत सरासरीच्या 151.24 टक्के पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पेरण्या श्रीगोंदे तालुक्यात, तर सर्वांत कमी पेरण्या नेवासे तालुक्यात झाल्या आहेत.

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, कर्जत व पारनेर या तालुक्यातील बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उत्तरेकडील कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, राहाता या तालुक्यांत मुळा, भंडारदरा धरणांमुळे सिंचनाची सुविधा आहे. गेली दोन वर्षे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती होती. गेल्या वर्षी 497 मिलिमीटरच्या तुलनेत केवळ 383 मिलिमीटर पाऊस झाला. पडलेला पाऊसही सर्वत्र सारखा नव्हता. श्रीगोंदे, कर्जत, पाथर्डी, जामखेड, पारनेर या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला. खरिपाच्या पेरणीचे जिल्ह्यात सरासरी 4 लाख 58 हजार 300 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी केवळ 3 लाख 81 हजार हेक्टर क्षेत्रावर गेल्यावर्षी खरिपाची पेरणी होऊ शकली. खरिपातील सर्व 580 गावांची अंतिम आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली. रब्बी हंगामातही कमी पावसामुळे पेरणी होऊ शकली नाही. जिल्ह्यात अपुर्‍या पावसाने गेल्यावर्षी 5 लाख 62 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होऊ शकली.

यंदा 1 जूनपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. 1 ते 30 जूनपर्यंत 1,899 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या 27.28 टक्के होता. 1 ते 9 जुलैपर्यंत एकूण 2,117 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 239 मिलिमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली. अकोले 177, संगमनेर 112, कोपरगाव 131, श्रीरामपूर 127, राहुरी 104, नेवासे 86.50, नगर 163, शेवगाव 144, पाथर्डी 133, पारनेर 145, कर्जत 200.2, श्रीगोंदे 190 व जामखेडमध्ये 163 मिलिमीटर पाऊस झाला.

गेल्या वर्षी 4 जुलैअखेर 18.61 टक्के पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत 28.48 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात उसाशिवाय खरिपाचे 4 लाख 1 हजार 230 हेक्टर क्षेत्र आहे. 8 हजार 200 हेक्टर क्षेत्र भाताचे आहे. त्यापैकी 3 हजार 397 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली. बाजरीचे एक लाख 9 हजार 830 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 1 लाख 11 हजार हेक्टरवर पेर झाली आहे.