आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिकेची धडक बसून पाथर्डीत बाप-लेक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - भरधाव येणाऱ्या रुग्णवाहिकेने जोराची धडक बसून मोटारसायकलवरून जाणारे बाप-लेक जागीच ठार झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास नगर-पाथर्डी रस्त्यावरील जांब कौडगाव शिवारात घडला. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. अपघातात आणखी एक मुलगा जखमी झाला. घटनास्थळी पोलिस उशिरा आल्यामुळे संतप्त जमावाने रुग्ण्वाहिका पेटवून दिली.
विष्णू साहेबराव जावळे (४५) तुकाराम विष्णू जावळे (१५) अशी ठार झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. ऋषिकेश विष्णू जावळे (६) हा गंभीर जखमी झाला आहे. तिघेही बाप-लेक रतडगावहून केळपिंपळगावला (ता. आष्टी, जि. बीड) निघाले होते. समोरुन आलेल्या मारुती ओमिनी रुग्णवाहिकेची त्यांना जोराची धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार झाले. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. महामार्ग पोलिसांना माहिती कळवूनही ते उशिरा घटनास्थळी आले. आमदार शिवाजी कर्डिले यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी तत्काळ मदतकार्याच्या सूचना केल्या.

सुमारे तीन तास मृतदेह रस्त्यावर पडून होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी आलेल्या महामार्ग पोलिसांनी हे ठिकाण कोणत्या ठाण्याच्या हद्दीत येते ते पहावे लागेल, असे म्हणताच संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिका पेटवून दिली. नंतर पोलिसांनी जमावाला शांत केले. दुसऱ्या रुग्णवाहिकेतून जखमी ऋषिकेशला रुग्णालयात हलवण्यात आले, तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. नंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरु होते.