आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाच्या कष्टाची नोंद होत नाही मंगेश तेंडूलकर यांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आई-वडीलमुलांमध्ये स्वप्न पहात कष्ट करतात. आई मुलांचे संगोपन करते. मात्र, बापाचे कष्ट मोठे असतात. कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असल्याचे समजून बाप काम करतो. मानहानी होत असते, तरी तो सहन करतो. आईच्या कष्टाची नोंद होते. मात्र, बापाच्या कष्टाची नोंद होत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी केले.
पुणे येथील बालगंधर्व सभागृहात विश्वमाता फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा आदर्श माता-पिता, राष्ट्रीय विश्वरत्न पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. आदर्श माता पुरस्कार पिंप्री निर्मळ (ता. राहाता) येथील मीराबाई विठ्ठलराव निर्मळ यांना पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ साहित्यिक डॉ. भास्करराव आव्हाड हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ प्र. ल. गावडे, आमदार राहुल जगताप, भाग्यश्री दांगट, विश्वमाता फाउंडेशनचे संस्थापक शिवाजी घाडगे आदी उपस्थित होते. तेंडूलकर म्हणाले, मुलांसाठी आई अश्रू गाळते, बाप आतल्या आत झुरतो. एवढे करून मोठी झालेली मुले दूर गेल्यावर होणारी त्यांच्या जीवाची घालमेल कोणाला दिसत नाही.
मीराबाई निर्मळ यांनी पती विठ्ठलराव यांना सामाजिक कार्यात खंबीरपणे साथ दिली. प्रतिकुल परिस्थितीमध्ये संघर्षमय जीवन जगून त्यांनी मुलांना कर्तृत्ववान बनवले. मुलांमध्येही सामाजिक कार्याची जाणीव निर्माण केली. त्यांचे तीनही मुले आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करून सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यांचा मुलगा डॉ. नितीन निर्मळ हे पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सचिन निर्मळ हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. कन्या डॉ. शारदा महांडुळे या आयुर्वेद तज्ज्ञ असून त्यांनी विधवा स्त्रियांसाठी सामािजक चळवळ सुरू केली आहे.
लेखनासाेबत त्यांनी गर्भवती महिलांसाठी तयार केलेले "गर्भिणीप्राश' या च्यवनप्राशची जागतिक विश्वविक्रमात (गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड )नोंद झाली आहे. यावेळी तेंडूलकर यांना राष्ट्रीय विश्वरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मीराबाई निर्मळ यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करताना राजीव खांडेकर. समवेत मंगेश तेंडूलकर, डॉ. भास्करराव आव्हाड, शिवाजी घाडगे आदी.