आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fertilizer Production Project,Latest News In Divya Marathi

कचरा डेपोतील खतनिर्मिती प्रकल्पासाठी पुन्हा सभा बोलावणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बुरूडगाव येथील कचरा डेपोत खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची सभा पुन्हा बोलावण्यात येणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत ही सभा होईल. दरम्यान, प्रकल्प सुरू करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत राष्‍ट्रीय हरित लवादासमोर 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोंडीत सापडलेली स्थायी समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुरूडगाव येथील कचरा डेपोत तीन महिन्यांत खतनिर्मिती प्रकल्प सुरू करा, तसेच तोपर्यंत पाच लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेश राष्‍ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाला मे महिन्यात दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रकल्प चालवण्यासाठी आलेली निविदा दोन वेळा स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवली, परंतु सभापती किशोर डागवाले यांच्यासह इतर सदस्यांनी ती राखून ठेवली.
निविदा दाखल केलेल्या संबंधित ठेकेदार संस्थेचा इतर ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी करू, मगच निविदा मंजूर करू, अशी भूमिका स्थायी समितीने घेतली होती. परंतु संबंधित संस्था इतर ठिकाणी चालवत असलेले प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे सदस्यांचा पाहणी दौरा रद्द झाला.

दरम्यान, प्रकल्प सुरू होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत 8 आॅगस्टला राष्‍ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या स्थायी समितीने खतनिर्मिती प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यासाठी पुन्हा सभा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
बुरूडगाव येथील भाऊसाहेब कुलट यांनी महापालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेवर 30 मे रोजी सुनावणी झाली. त्यात महापालिकेने तीन महिन्यांत खतनिर्मिती प्रकल्प सुरू करावा, तसेच तोपर्यंत पाच लाखांची अनामत जिल्हा प्रशासनाकडे जमा करावी, असे आदेश लवादाने दिलेले आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनाने पाच लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. परंतु प्रकल्प चालवण्यासाठी आलेली निविदा स्थायी समितीने राखून ठेवल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय हरित लवादाची सुनावणी जवळ आल्याने स्थायी समितीने तातडीने सभा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. खतनिर्मिती प्रकल्पासह नेहरू मार्केट येथे भाजीविके्रत्यांना बसण्यास जागा देण्याबाबतही सभेत निर्णय होणार आहे.
गुन्हा दाखल होऊ शकतो
दिलेल्या मुदतीत खतनिर्मिती प्रकल्प सुरू न झाल्यास राष्‍ट्रीय हरित लवाद महापालिकेच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्याची शक्यता आहे. महापौर, स्थायीचे सभापती व आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, तसेच जिल्हा प्रशासनाकडे जमा केलेली पाच लाखांची अनामत रक्कमही दंड स्वरूपात जप्त होईल. त्यामुळे 8 ऑगस्टला होणा-या लवादाच्या सुनावणीकडे प्रशासनासह पदाधिका-यांचे देखील लक्ष लागले आहे.

योग्य निर्णय घेऊ...
निविदा भरलेल्या संस्थेचे इतर ठिकाणचे प्रकल्प पाहणे गरजेचे आहे. ते प्रकल्प कमी क्षमतेचे व अर्धवट आहेत. त्यामुळे पाहणी दौरा रद्द केला. मनपाच्या दोन अधिका-यांमार्फत या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल सभेत ठेवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.’’ किशोर डागवाले, सभापती, स्थायी समिती.