आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कालवा क्षेत्रातही शेततळ्यांना मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- कमी पर्जन्यमानामुळे बागायती क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात घट होत आहे. ही पाणीपातळी पुन्हा वाढण्यासाठी बारमाही कालवा क्षेत्रातही शेततळी निर्माण करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी दिली.
शंकरराव कोल्हे व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तटकरे यांच्या निवासस्थानी कोपरगाव येथील 50 शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची बैठक मंगळवारी झाली. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. निळवंडे डाव्या कालव्यांतर्गत येणार्‍या तळेगाव, कोपरगाव शाखांतर्गत वितरिकांचे काम तत्काळ सुरू करावे, डाव्या कालव्याच्या मुखद्वाराजवळील मेहंदुरी, रेडे गावातील जमीन अधिग्रहित करून कामास गती द्यावी, वैतरणेचे अतिरिक्त पाणी मुकणेत घ्यावे, नाशिक शहरासाठी प्रस्तावित किकवी धरणाचे काम सिंहस्थ निधीतून मार्गी लावावे, गोदावरी डावा व उजव्या कालव्यांचे नूतनीकरण करावे, पालखेड डाव्या कालव्यास समांतर जोड चारी काढावी, बागायती क्षेत्रात शेततळी निर्माण करण्याची परवानगी द्यावी, नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांतून 10 टक्के पाणी उपशाची परवानगी द्यावी आदी मागण्या कोल्हे यांनी मांडल्या. पाटबंधारे प्रधान सचिव आबासाहेब पाटील, डी. पी. शिर्के, यू. नी. कंदारफळे, सभापती मच्छिंद्र केकाण, केशव भवर, शरद थोरात, त्र्यंबक सरोदे आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे व कोपरगाव तळेगाव शाखा वितरिकांचे काम डिसेंबरअखेर अंदाजपत्रके, निविदा पूर्ततेसह सुरू करण्यात येणार आहे. या कालव्यांच्या वितरिकेसाठी प्रत्येकी 22 कोटी मंजूर झाले आहेत. कोल्हे म्हणाले, ज्यांनी निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना पाणी मिळत नाही व ज्यांनी सतत विरोध केला त्यांनाच पाणी मिळते. कामाच्या विलंबामुळे या धरणाचा खर्च 2100 कोटींवर गेला आहे. आतापर्यंत 510 कोटी खर्च झाला आहे. यंदा 135 कोटींची तरतूद आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘एआयबीपी’अंतर्गत केंद्रीय जलआयोगाची मान्यता घेण्याचे आवाहन कोल्हे यांनी केले. गोदावरी डाव्या व उजव्या तट कालव्याच्या नूतनीकरणासाठी 455 कोटींचा प्रस्ताव सादर झाला असून मूळ 75 कोटींच्या खर्चास तत्काळ मंजुरी दिली आहे. कालबाह्य झालेल्या जलसेतूचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. किकवी धरणाच्या कामासाठी 510 कोटी सिंहस्थ निधीतून मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू. पालखेड डाव्या कालव्यांतर्गत येणार्‍या कोपरगाव तालुक्यातील चारी नं. 42, 45, 46 यांना समांतर जोडचारी काढावी, त्यासाठी आठ दिवसांत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तटकरे यांनी दिले.