आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'रिलायन्स'प्रकरणी गुन्हे दाखल करा,अधिका-यांना काळे फासण्याचा मनसेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रिलायन्स कंपनीकडून रस्ते खाेदाईच्या भरपाईपोटी मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित अधिका-यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा अधिका-यांना कोणत्याही क्षणी काळे फासण्याचा इशारा मनसेच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गिरीश जाधव, सुमित वर्मा, नितीन भुतारे आदी पदाधिका-यांनी चर्चा केली. फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीने शहरात रस्ते खोदाई केली. खोदाईच्या दुरुस्तीसाठी कंपनीने मनपा प्रशासनाकडे जवळपास ५ कोटी रुपये भरले. कंपनीने भरलेल्या पैशांतून खोदाई झालेल्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने निविदा मागवून दुरुस्तीची कामे होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. या निधीतून ३६ कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यातील १६ कामे पूर्ण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. लक्ष्मीमाता मंदिर ते प्रोफेसर कॉलनी चौक, तसेच कुष्ठधाम ते प्रोफेसर कॉलनी चौकादरम्यान दुरुस्तीचे काम झाले नसतानाही ठेकेदार मजूर संस्थेला अनुक्रमे ९ लाख ९० हजार व ७ लाख ५० हजार अदा करण्यात आले. शहर अभियंत्यानेच हे मान्य केले. ऑनलाइन निविदा पद्धत डावलून अधिकारी व पदाधिका-यांनी संगनमत करून मजूर संस्थांना कामे देण्याची बेकायदेशीर कृती केली. या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा नगरकरांच्या डोळ्यात धूळफेक करणा-या अधिका-यांना कोणत्याही क्षणी काळे फासू, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. मनोज राऊत, परेश पुरोहित, अभिषेक मोरे, नीलेश खांडरे आदी यावेळी उपस्थित होते.

पदाधिका-यांकडून नगरसेवकांना चेक
मनसेच्या नगरसेवकांनी रिलायन्सकडून मिळालेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून मनपा आयुक्तांना कामाची पाहणी करण्यास भाग पाडले. अायुक्तांनी मनसे नगरसेवकांसमवेत ५ फेब्रुवारीला कामाची पाहणी करून चौकशीचे आश्वासन दिले. त्याच्या दुस-याच दिवशी पदाधिका-यांनी आयुक्तांना भेटून तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मनसे पदाधिका-यांनी यातून पक्षाच्याच नगरसेवकांना चेक दिल्याची चर्चा आहे.