आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KOthala Area Riots FIR Lounched Agints 40 People

कोठला दगडफेक प्रकरण : चाळीस जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोठला परिसरात रविवारी दुपारी झालेल्या दंगलीप्रकरणी तोफखाना पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला. दंगली व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम कायद्यान्वये ४० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी २५ जणांच्या टोळक्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, रविवारच्या घटनेमुळे अनधिकृत कत्तलखान्यांकडे महापािलका व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे अधोरेखित झाले.
कोठला परिसरातील बापूशाह दर्ग्यामागे रविवारी दुपारी काही युवकांनी एका कत्तलखान्यातून जनावरांची सुटका केली. ३ गायी, ५ बैल व एका वासराची सुटका करून ट्रकमधून ते गोशाळेत घेऊन जाताना कत्तलखाना चालवणाऱ्या दुसऱ्या गटातील युवकांनी दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परस्परविरोधी घोषणाबाजी व दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे दंगलसदृश वातावरण तयार झाले. यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे, उपनिरीक्षक चिटमपल्ले यांच्यासह फौजफाटा उपस्थित होता, पण पोलिसांना एकाही दंगलखोराला ताब्यात घेता आले नाही.

या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांवर कत्तलखाना चालवणाऱ्या टोळक्याने हल्ला चढवला. त्यात तीन पोलिस जखमी झाले. जनावरे नेणाऱ्या ट्रकवरही दंगलखोरांनी दगडफेक केली. त्यात ट्रकचालक विकास दादाभाऊ चोभे (वय १८, बाबुर्डी बेंद) जखमी झाला.

पोलिसांची स्वतंत्र फिर्याद
राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलिस अधिकारी संतोष श्यामराव धनलगडे, अनिल रभाजी औटी व पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बबन विधाते यांना दंगलखोरांनी गज व काठ्यांनी जबर मारहाण केली. तिन्ही अधिकारी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर दंगलखोरांनी कृष्णा विधाते यांचा १२ हजार किमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाइल लांबवला. विधाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात २५ जणांविरुद्ध मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जबरी चोरी आदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आजवरचे दुर्लक्षच भोवले
रविवारी झालेल्या प्रकाराबाबत तोफखाना पोलिसांनी निखिल बाळकृष्ण धंगेकर यांच्या फिर्यादीवरुन ३० ते ४० जणांविरुद्ध दंगल, महाराष्ट्र प्राणी अधिनियम १९७६ चे कलम ५, ६, ७ व ११ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११ (१)(१३) क्रिमिनल अमेंडमेंट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत पोलिसांनी कत्तलखान्यातून जनावरांची १२ शिंगे जप्त केली आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अनधिकृत कत्तलखान्यांकडे आजवर महापालिकेने केलेले दुर्लक्ष पोलिसांच्या जीवावर भोवल्याची चर्चा शहरात आहे.