आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन उपेक्षितच; अनुदान मिळूनही नवीन बंबांची अजून खरेदी नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या जुन्या वास्तूतील कौन्सिल हॉलला लागलेल्या आगीच्या घटनेला दोन महिने पूर्ण होत आले, तरी अग्निशमन सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. गेल्या सहा महिन्यांत शासनाकडून 73 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, तरीही दोन नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्याच्या प्रस्तावाकडे प्रशासन व पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे.

1 मे रोजी कौन्सिल हॉलला भीषण आग लागली. या दुर्घटनेमुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. मनपाची अग्निशमन सेवा कशी तोकडी व बेभरवशाची आहे, हे यावरून स्पष्ट झाले. सभागृहातील महापुरुषांची दुर्मिळ तैलचित्रे आगीत नष्ट झाली. घटना घडल्यानंतर प्रशासन व पदाधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषद घेऊन चौकशीचे आदेश दिले, तसेच अग्निशमन सेवा सक्षम करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दोन नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सांगितले होते. मात्र, दोन महिने पूर्ण होत आले, तरी नवीन बंबांचा प्रस्ताव तयार झालेला नाही. आगीचे कारणही अजून स्पष्ट झालेले नाही.

तथापि, प्रशासनाने अग्निशमन विभागप्रुख शंकर मिसाळ व विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब साळवे या दोन अधिकार्‍यांवर ठपका ठेवला असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.

सध्या अग्निशमन विभागाची अवस्था दयनीय झाली आहे. प्रशिक्षित कर्मचार्‍यांची कमतरता, अत्याधुनिक फायर स्टेशन, तसेच आवश्यक साधनसामग्रीचा अभाव यामुळे या विभागाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. नगर-कल्याण महामार्गावरील शिवाजीनगर भागात अद्ययावत फायर स्टेशन उभारण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर गोळा करणार्‍या मनपाला अजूनही अग्निशमन सेवा सक्षम करता आलेली नाही. शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाशिवाय कोणताही खर्च अग्निशमन सेवेवर झालेला नाही.

या विभागात काम करणार्‍या 36 पैकी केवळ 7 कर्मचारी प्रशिक्षित असून उर्वरित सर्व कर्मचारी बिगारी आहेत. जीव धोक्यात घालून आग शमवण्याचे काम करणार्‍या या कर्मचार्‍यांचा मनपाने साधा विमादेखील काढलेला नाही. नियमानुसार 10 चौरस किलोमीटरसाठी एक अग्निशमन गाडी असायला हवी, परंतु चार गाड्यांपैकी तीन गाड्या शहरात, तर एक गाडी सावेडीतील फायर स्टेशनला असते. पेट्रोल-डिझेलने लागलेली आग शमवण्यासाठी फक्त एकच स्पेशल फोंक टेंडर उपलब्ध आहे. ही सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी उदासीन आहेत.