आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निघोज येथील औषध दुकानास भीषण आग, दुर्घटनेत लाखोंचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - निघोज येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भैरवनाथ मेडिकलला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. दुकानमालक दत्तात्रेय परंडवाल यांनी नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, लाकडी फर्निचरमुळे आग भडकली. संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तीन तासांनंतर आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे.

दुकानातून धूर येत असल्याचे गुरख्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने परंडवाल यांना ही माहिती दिली. परंडवाल त्यांच्या पत्नीने दुकानाकडे धाव घेतली. शटर उघडले त्यावेळी आग संपूर्ण दुकानभर पसरलेली होती. परंडवाल यांनी भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वरखडे, ज्ञानेश्वर तनपुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गावातील लोकांना बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी कन्हेय्या उद्योग समूहाचे संचालक शांताराम लंके यांच्या डेअरीतील दोन टँकर बोलावले.

आग आटोक्यात आणण्यासाठी काही नागरिकांनी जेसीबीने दुकानाची एक भिंत पाडली. टँकर आल्यानंतर पाण्याच्या फवाऱ्याने आग शमवण्याचे काम सुरू झाले. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बबन कवाद यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याशी संपर्क करून नगर महानगरपालिकेचे अग्निशमन बंब मागवले. हे बंब पहाटे साडेचारच्या सुमारास निघोजमध्ये पोहोचले. तोपर्यंत आग आटोक्यात आली होती. मात्र, दुकानातील सगळे सामान खाक झाले होते.

सकाळी तहसीलदार भारती सागरे यांनी घटनास्थळास भेट दिली. स्थानिक तलाठी, तसेच मंडलाधिकाऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. परंडवाल कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सागरे यांनी सांगितले.