आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशामक उपकरणे अडगळीत;विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगीसारख्या दुर्दैवी घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण मंडळाने अग्निशामक उपकरणे बसवली. मात्र, तब्बल सहा वर्षे झाली तरीही या उपकरणांचे रिफिल अद्यापि बदलण्यात आलेले नाही. कालबाह्य झालेली ही उपकरणे शिक्षकांनी चक्क अडगळीत फेकली आहेत. यानिमित्ताने हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात मनपाच्या बारा शाळा आहेत. अनेक शाळा शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या भागात आहेत. शाळेत आगीसारख्या दुर्दैवी घटनांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक शाळेत अग्निशामक उकरणे बसवली आहेत. अग्निशामक उपकरणाची रिफिल दरवर्षी बदलणे बंधनकारक आहे. मात्र, आजपर्यंत एकाही उपकरणाची रिफिल बदलण्यात आली नसल्याने सर्व उपकरणे कालबाह्य झाली आहेत. शिक्षण मंडळाकडून उपकरणे हाताळण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. त्यासाठी मनपाच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचा-यांनी प्रत्येक शाळेत जाऊन उपकरणांविषयची माहिती दिली.
सर्जेपु-यातील अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्राथमिक विद्यालय, भूतकरवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय, बुरूडगाव रोडवरील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय, रेल्वेस्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय आदी शाळांमधील उपकरणे अडगळीत पडली आहेत. कपाट, स्टोअररुम, वर्गखोलीचा कोपरा, कपाटाच्या वर अशा विविध ठिकाणी उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.
प्रशिक्षण दिले - मनपाच्या शाळांमध्ये अग्निशामक उपकरणे बसवल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. मात्र, केवळ प्रशिक्षण महत्त्वाचे नाही, तर उपकरणांचे रिफिल दरवर्षी करण्याची आवश्यकता आहे. शाळांमधील उपकरणे सध्या अडगळीत पडली आहेत.’’ - एस. यु. मिसाळ, मनपा, अग्निशामक विभागप्रमुख.
उपकरणे आवश्यक - महापालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना नाहीत. कालबाह्य झालेली अग्निशामक उपकरणे सुरू करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे.’’ - राजेश मंडलिक, पालक
प्रतिक्रियेस टाळाटाळ - मनपा शाळांमधील कालबाह्य झालेल्या अग्निशामक उपकरणांसंबंधी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुधाकर शिदोरे यांना संपर्क साधला असता त्यांनी ‘मी कामात आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.