आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंप गोळीबारातील आरोपींचा जामीन फेटाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव परिसरातील पंजाब ऑटो सर्व्हिस पेट्रोल पंपावर २० जुलैला झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार परप्रांतीय आरोपींचा जामीन जिल्हा न्यायाधीश ए. डी. तनखीवाले यांनी शनिवारी फेटाळला. आरोपी परराज्यातील असल्याने जामीन मिळाल्यास तपासाकरिता हजर होणार नाहीत, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला होता.

कृपालसिंग गुज्जर (२५, काठमागव, जि. भिंड, मध्य प्रदेश), बंटी ऊर्फ राघवेंद्र राजपूत (२४, आलमपूर, मध्यप्रदेश), रवी शर्मा (२८, कुंजविहार, मध्य प्रदेश) व अमीर सलीम बेग (१९, जामा मशिदीसमोर, जि. भिंड, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी २० जुलैला पंजाब ऑटो पेट्रोल पंपावरील कर्मचारी नितीन युवराज भोसले व त्याच्या सहकाऱ्याच्या दिशेने गाेळीबार केला होता. नंतर स्वीफ्ट कार (एमपी ०७ सीबी ३९९०) मधून पुण्याच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करून सुपा टोलनाक्यावर या सर्वांना ताब्यात घेतले. कोतवाली पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे, ७ काडतुसे व कार जप्त केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर जामीन मिळावा, म्हणून आरोपींतर्फे जामीनासाठी अर्ज केला. न्यायाधीश तनखीवाले यांच्यासमोर अर्जावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश लगड यांनी बाजू मांडली. आरोपी परराज्यातील असल्याने जामीन मिळाल्यास तपासास हजर राहण्याची शक्यता कमी आहे, असा युक्तिवाद अॅड. लगड यांनी केला. तो ग्राह्य धरून आरोपींचे जामीन फेटाळून लावले.