आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Ftime Elected MLA Give First Preference To Water Issue

सहाही नव्या आमदारांचे प्राधान्य पाणीप्रश्नाला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्‍ह्यातीलबारापैकी सहा मतदारसंघांचे नेतृत्व प्रथमच युवा नवखे आमदार करत आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात यातील बहुतांशी आमदार पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधणार आहेत. त्याचबरोबर विजेचे भारनियमन, रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृहे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, नगर शहरातील प्रलंबित उड्डाणपूल हे प्रश्नही हे आमदार सभागृहात उपस्थित करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांत प्रथमच नवे चेहरे निवडले गेले. हे आमदार प्रथमच विधानसभेवर गेल्याने ते कुठले प्रश्न िहवाळी अधिवेशनात सभागृहात मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैभव पिचड हे अकोले मतदारसंघातून प्रथमच निवडून आले आहेत. त्यांना राजकीय वारसा असून ते जिल्‍हा परिषदेचे सदस्यही आहेत. त्यांचे वडिल मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी िवकासमंत्री आहेत. कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे या प्रथमच आमदार झाल्या आहेत. त्यांनाही राजकीय वारसा असून,ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या त्या सूनबाई आहेत. नेवासे मतदारसंघातून आमदार झालेले बाळासाहेब मरकुटे यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. पाथर्डी-शेवगावमधून मोनिका राजळे प्रथमच आमदार झाल्या आहेत. त्यांनादेखील राजकीय वारसा आहे. माजी आमदार राजीव राजळे यांच्या त्या पत्नी आहेत. जिल्‍हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अडीच वर्षे कारभार पाहिला. श्रीगोंदे मतदारसंघातून राहुल जगताप प्रथमच आमदार झाले आहेत. त्यांनाही राजकीय वारसा असून, ते ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप यांचे चिरंजीव आहेत. नगरचे महापौर संग्राम जगताप हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आमदार अरुण जगताप यांचे ते चिरंजीव आहेत. नव्या दमाचे हे सहा आमदार अधिवेशनात कोणता ठसा उमटवतात, याचे अनेकांना कुतूहल आहे.

नगर शहर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय, या बरोबरच अतिशय सुंदर अशी निसर्गरम्य स्थळे नगर जिल्ह्यात आहेत. पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना दिल्यास उत्पन्नवाढीबरोबर रोजगारवृद्धीही होऊ शकते. शिवाय पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठीही याची मदत मिळू शकते. जिल्ह्यातील नव्या आमदारांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधी मिळवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.

पाथर्डी शेवगाव हे दोन्ही तालुके दुष्काळी आहेत. या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी मजूर अन्य जिल्‍ह्यांत स्थलांतर करतात. मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी कायमस्वरूपी वसतिगृहे सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. या मतदारसंघात पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. पाण्याबाबतचा प्रश्न सभागृहात प्रामुख्याने मांडण्यात येणार असून त्याचबरोबर रस्ते, वीज, महिलांसाठी स्वच्छतागृहे याबाबतचे प्रश्न मांडण्यात येतील.” मोनिकाराजळे, आमदार,पाथर्डी-शेवगाव.

नेवाशात संत विद्यापीठ होणे आवश्यक आहे. तालुक्याला मुळा उजवा डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळते. मात्र, पाणी वाटप संस्थांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना महागड्या दराने पाणी विकत घ्यावे लागते. या संस्था रद्द करायला हव्यात. रस्त्यासाठी निधी मागण्यात येईल. विजेच्या भारनियमनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सम प्रमाणात वीज देण्याबाबतची मागणी मांडण्यात येणार आहे.” बाळासाहेबमुरकुटे, आमदार,नेवासे

नगर शहरातील उड्डाणपुलाबाबतचा प्रश्न मी सभागृहात मांडणार आहे. या उड्डाणपुलाची रुंदी वाढवण्याबाबत काही तरतूद करता येईल, याबाबत विषय मांडणार आहे. शहरातील नागापूर औद्योगिक वसाहतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तेथे मूलभूत सुविधा मिळण्याबाबतचा मुद्दा मी उपस्थित करणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीत नवीन उद्योग यावेत याबाबतचा प्रश्नही मांडण्यात येईल. बुरुडगावचा पाणीप्रश्नाबाबतही चर्चा उपस्थित करण्यात येणार आहे.” संग्रामजगताप, आमदार,नगर.

कमी पावसामुळे तसेच आता झालेल्या अवका‌ळी पावसामुळे अकोले तालुक्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी यासाठी मी सभागृहात आवाज उठवणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान अतिशय कमी आहे. हे अनुदान हजार रुपये करावे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून केंद्राप्रमाणेच त्यांना प्रवास भत्ता अन्य सुविधा द्याव्यात. नदीपात्रात शिवकालीन टाक्या बांधाव्यात, यासाठी लक्ष्यवेधी मांडेन.” वैभविपचड, आमदार,अकोले

पाण्याबरोबरच रस्ते महिलांसाठी स्वच्छतागृहे हे दोन प्रश्नही मी मांडणार आहे.नवीन योजना याव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी लक्ष्यवेधी मांडेन. इंडिया बुल्स कंपनी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अन्यायकारक आहे. मराठवाडा नाशिकच्या पाण्याबाबत वेगळा निर्णय घेण्याबाबत सरकारशी चर्चा करण्यात येईल.” स्नेहलताकोल्हे, आमदार,कोपरगाव.

घोड कालव्याच्या दुरुस्तीसाठी २३ कोटी मिळाले होते. त्यातील केवळ ११ कोटी खर्च झाले. उर्वरित पैसे खर्च करण्यात आलेले नाहीत. कालवा दुरुस्तीचे काम तातडीने होणे आवश्यक आहे. या प्रश्नी लक्ष्यवेधी मांडण्यात येईल. श्रीगोंदे तालुक्यात दरोड्यांचे सत्र सुरू आहे. त्याचा तपास संथ गतीने सुरु आहे. अनेक खून प्रकरणांचा तपास लागलेला नाही. हा मुद्दादेखील मांडण्यात येणार आहे. नगर-दौंड रस्त्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.” राहुल जगताप, आमदार,श्रीगोंदे.