आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Stop Toll In BJP States, Chhagan Bhujbal Challenges Munde

भाजपशासित राज्यांत अगोदर टोल बंद करा,छगन भुजबळ यांचे मुंडे यांना आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - टोलची संकल्पना शिवसेना-भाजप युतीमुळेच राज्यात आली. गुजरात, मध्य प्रदेश आदी भाजपशासित राज्यांमधील टोल आधी बंद करून दाखवा. त्याचा अभ्यास करून राज्यातील टोल बंद करू, असे आव्हान सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना दिले. सत्तेत आल्यानंतर राज्यातील टोल बंद करू, असे मुंडे यांनी इचलकरंजी येथे झालेल्या महायुतीच्या सभेत जाहीर केले होते.
बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते या वेळी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांकडून रस्ते विकसित करण्यात आले आहेत. याच निकषानुसार उदो उदो केल्या जाणा-या गुजरात व मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये रस्ते विकसित करून टोलवसुली सुरू आहे, असा दाखला भुजबळ यांनी दिला.
राज्यात 2 लाख 40 हजार किलोमीटर रस्ते असून यातील अवघ्या 1 टक्का रस्त्यांवर टोलनाके आहेत. अर्थसंकल्पातील निधीतून उर्वरित 99 टक्के रस्त्यांवर खर्च केला जातो. टोल टाळायचे म्हटल्यास अर्थसंकल्पीय निधी संबंधित रस्त्यांकडे वळवावा लागेल, असे सांगून बीओटीचे प्रकल्प यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
सतत आंदोलन करणे फार सोपे; राज ठाकरे यांनाही टोला
फुकटात रस्ता वापरा, असे सांगत आंदोलन करणे फार सोपे आहे. मात्र, यातून विकास ठप्प होणार आहे. स्वत: काही करायचे नाही. विरोध करून विकासाच्या गप्पा मारायच्या हे बरोबर नाही. विरोधासाठी विरोध करणार असाल, तर उत्तरही देणार नाही. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे कठीण असल्याचा टोला भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.