आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही आतापर्यंत काय दिवे लावले ते सांगा, आमदार अनिल राठोड यांचा विखे यांना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीवर टीका करण्यापेक्षा आतापर्यंत तुम्ही काय दिवे लावले ते सांगा? नगर शहराची उठाठेव करण्यापेक्षा स्वत:च्या खात्याकडे लक्ष द्या. हिंमत असेल, तर एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करा, असे आव्हान देत आमदार अनिल राठोड यांनी सोमवारी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचा चांगलाच समाचार घेतला.

महापालिकेने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते. मंत्री विखे यांनी रविवारी (21 जुलै) काँग्रेसच्या एका कार्यक्रमात मनपातील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीवर घणाघाती टीका केली होती. त्यास उत्तर देताना राठोड म्हणाले, विखेंकडे पिढय़ांपिढय़ा सत्ता आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सत्तेचा काय उपयोग केला? ते ज्या खात्याचे मंत्री आहेत, त्या खात्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. स्वत:च्या मतदारसंघात त्यांनी काय दिवे लावले, हे अगोदर जनतेला सांगावे. आम्ही जर काढायला बसलो, तर त्यांचे सर्व काळे कारनामे बाहेर येतील, असा इशाराही राठोड यांनी दिला.

सत्ताधारी काँग्रेस आघाडी सरकारने लाडावून ठेवलेले प्रशासकीय अधिकारी नगर शहरात केवळ पैसे खाण्याचे काम करत आहेत, असा आरोपही राठोड यांनी केला. महापौर शीला शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच शहरात विविध विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर शिंदे म्हणाल्या, सत्तेवर आल्यापासून शहर सुधारित पाणीपुरवठा योजना, केडगाव पाणी योजना, नगरोत्थान योजनेतील कामे, शहरातून जाणार्‍या माहामार्गांचे विद्युतीकरण आदी विकासकामे मार्गी लागली आहेत.