आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: स्वातंत्र्यानंतर प्रथमच पोहोचली मुर्शतपूर गावामध्ये एसटी बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुर्शतपूर येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये आमदार मोनिका राजळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट यांनी प्रवास केला. - Divya Marathi
मुर्शतपूर येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये आमदार मोनिका राजळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट यांनी प्रवास केला.
शेवगाव- स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर प्रथमच सोमवारी शेवगाव ते मुर्शतपूर (धावणवाडी) ही बस या गावात आली. ग्रामस्थांनी ही बस सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार मोनिका राजळे तसेच आगारप्रमुख, चालक वाहक यांचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केले. 

शेवगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच राज्य परिवहन महामंडळाची बस आली नव्हती. वृद्ध, महिला, ग्रामस्थांना शाळेतील मुलांना शाळा, महाविद्यालयांत तालुक्याला जाण्यासाठी खासगी वाहनाने शेवगावला यावे लागत होते. त्यामुळे या गावातील मुलींना अर्ध्यावर शिक्षण सोडून द्यावे लागले. येथील तरुणांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही बस सुरू होत नव्हती. शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांना गावातील तरुणांनी बससंदर्भात माहिती देऊन या गावासाठी बस सुरू करण्याची विनंती केली. त्यांनी शेवगाव आगार प्रमुख प्रल्हाद घुले, सुंदर लटपटे यांना या गावात बस सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी पाठपुरावा करून बस सुरू करत असल्याचे पत्र ग्रामस्थांना दिले. 

सोमवारी आमदार मोनिका राजळे यांनी स्वत: शेवगाव आगारत येऊन या बसचे पूजन केले. शेवगाव ते मुर्शदपूर या नवीन गाडीने स्वत: आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवास केला. या बसमधील कार्यकर्ते पत्रकारांचे जाण्या-येण्याचे १९९२ रुपये तिकिटाचे भाडेही आमदार मोनिका राजळे यांनी अदा केले. बसमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले, दिनेश लव्हाट, तालुका सरचिटणीस भीमराज सागडे, नगरसेवक महेश फलके, वाय. डी. कोल्हे, नितीन फुंदे, सुनील रासने, आगारप्रमुख प्रल्हाद घुले, राहुल बंब, पंकज भागवत आदी उपस्थित होते. 

गावामध्ये बस येताच ग्रामस्थांनी फटाक्यांची गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार मोनिका राजळे, आगारप्रमुख घुले, चालक अंबादास गुठे, वाहक सुरेखा महानुभव यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक धोंडिराम धावणे होते. यावेळी अशोक ढाकणे, विठ्ठल खर्चन, डाॅ. गणेश धावणे, डाॅ. मल्हारी लवांडे, रंजना धावणे, अप्पासाहेब धावणे, अमोल धावणे, नाना धावणे, बाळासाहेब धावणे आदी उपस्थित होते. अप्पासाहेब जवरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भीमराज सागडे यांनी केले. विठ्ठल खर्चन यांनी आभार मानले. दरम्यान, एसटी बस सुरू झाल्याने शेवगावला येण्यासाठी ग्रामस्थ विद्यार्थ्यांची सोय झाली. 

ग्रामस्थांचा उत्साह पाहून समाधान 
तालुक्यातीलकाही मंडळी आम्ही पाठपुरावा केलेल्या कामांबाबत ते पूर्ण होताना दिसताच निवेदनबाजी करून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मात्र, जनता सुज्ञ आहेत. मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे केली. त्यावेळी मला जेवढा आनंद झाला नाही, तो आज गावामध्ये बस आल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहून झाला. यावेळी माझ्या शालेय जीवनातील एसटी बसचा प्रवास मला आठवला, असे यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...