नगर- बालसुधारगृहातून रविवारी (२६ जुलै) पहाटे मुलींनी पलायन केल्यामुळे बालगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सोमवारी सकाळी बालसुधारगृहाची पाहणी केली. या पाहणीत कवडे यांनी सुधारगृह प्रशासनाची झाडाझडती घेतली. सुरक्षाव्यवस्था कडक करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याचेही आदेशही त्यांनी सुधारगृहाच्या प्रशासनाला दिले. बालसुधारगृहाची सुरक्षा कडक करण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना त्यांनी केली.
रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास सुधारगृहातून पाच मुलींनी पलायन केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. पलायन केलेल्या मुलींमध्ये दोन राहुरीच्या, एक नागापूरची, एक पारनेर तालुक्यातील भोयरे पठारची, तर एक अकोले येथील आहे. सुधारगृहाच्या काळजीवाहक रेखा घनश्याम वर्मा रात्री झोपलेल्या असताना त्यांच्या उशीखाली ठेवलेली चावी मिळवून या मुलींनी पलायन केले. पळून जाण्यासाठी त्यांनी एका अनाथ मुलीची मदत घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
जिल्हाधिकारी कवडे यांनी सोमवारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाळा हेडे, समन्वयक कुंदन पठारे, सुधारगृहाचे दोन विश्वस्त, महिला बालकल्याण अधिकारी एन. यू. खरात यांच्यासह संयुक्तपणे सुधारगृहाची पाहणी केली.
सुधारगृहाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी मानधन तत्त्वावर काही सुरक्षा कर्मचारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केल्या. बाल सुधारगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
मुलींच्या पलायन प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस िनरीक्षक कालिदास पोतदार हे करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तपासी अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती जाणून घेतली. बालिकांच्या शोधाकरिता एक पथक नेमले असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. दरम्यान, पलायन प्रकरणानंतर काळजीवाहक रेखा वर्मा यांना सुधारगृह प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे. काही महिन्यांपूर्वी बालसुधारगृहातून मुलेही पळून गेली होती.
घटनेच्या वेळी सुरक्षा रक्षक जागा नव्हता
बालसुधारगृहाच्यापाहणीदरम्यान जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना अनेक चुकीच्या बाबी ठळकपणे जाणवल्या. सुधारगृहाच्या फलकावर मुला-मुलींची संख्या अपडेट केलेली नव्हती. शिवाय प्रमुख प्रवेशद्वारावर नेमलेला सुरक्षा रक्षकही घटना घडली तेव्हा जागा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत लक्षात आले. हे प्रकार टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दक्षता