आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पाच रुग्णांना डेंग्यूची लागण, महापौरांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या विविध भागात डेंग्यूची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात ४० पेक्षा अधिक डेंग्यूसदृश रुग्ण असून त्यापैकी पाचजणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी याची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिले. महापौर अभिषेक कळमकर यांनी मात्र या गंभीर प्रश्नाकडे अद्याप ढुंकून पाहिलेले नाही.
केडगाव, स्टेशन रोड, दिल्लीगेट, बुरूडगाव आदी भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. पाचजणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असताना मनपाच्या आरोग्य विभागाला जाग आलेली नाही. उपाययोजना तर दूरच, साधी धूरफवारणीही या विभागाने सुरू केलेली नाही. जनजागृतीसह उपाययोजना सुरू असल्याचा पोकळ दावा या विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी आरोग्य विभागाची कानउघाडणी करून तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते. परंतु कळमकर यांना अद्याप सत्कार समारंभातून वेळ मिळालेला नाही. याउलट माजी महापौर विद्यमान आमदार जगताप यांनी मात्र साथीच्या आजाराबाबत मनपा प्रशासनाला जाब विचारला आहे. जे काम महापौर कळमकर यांनी करायला हवे, ते काम माजी महापौर करत आहेत. दूषित पाणी, डास, कचऱ्याचे ढिग यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौर कळमकर यांनी हार-तुरे स्वीकारत बसण्याऐवजी नगरकरांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कर भरूनही नागरिकांना आरोग्याशी संबंधित एकही सुविधा मिळत नाही. दूषित पाणी, डास, कचऱ्याचे ढिग यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापौर "नॉट रिचेबल'
शहरातडेंग्यूची मोठ्या प्रमाणात लागण झाली असून त्याबाबत काय कार्यवाही करण्यात आली, अशी विचारणा करण्यासाठी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी दूरध्वनीवर दोनदा संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिल्याने प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु राजूरकर यांनी देखील नेहमीप्रमाणे काहीच प्रतिसाद दिला नाही. यावरूनच महापाैरांसह अधिकारी साथीच्या रोगांबाबत किती गंभीर आहेत, ते स्पष्ट होते. यानिमित्ताने शहरातील सामान्य नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहवाल सादर करा
साथीचेआजार रोखण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने अद्याप कोणत्याच उपाययाेजना केलेल्या नाहीत. मागील अनुभव पाहता साथीचे रोग डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक होते, परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही. शहराच्या विविध भागात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना माजी महापौर विद्यमान आमदार जगताप यांनी आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या आहेत.