आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकायुक्तांनी मागवला मनपाकडून अहवाल, कर्मचा-यांच्या वादातून प्रकरण आले चव्हाट्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- झेंडीगेट प्रभागातील अनधिकृत पाच हजार नळजोडांबाबत अहवाल सादर करा, असे आदेश लोकायुक्तांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मनपाच्याच एका कर्मचा-यांने आपसातील वादातून लोकायुक्तांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले. आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या मर्जीतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकसबुद्धीने छळ करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. आयुक्त कुलकर्णी बघ्याची भूमिका घेत कर्मचा-यांच्या शीतयुद्धास खतपाणी घालत आहेत.
झेंडीगेट प्रभाग कार्यालयातील लिपिक एजाज शेख व काही नगरसेवक यांनी संगनमत करून प्रभागात सुमारे पाच हजार अनधिकृत नळजोड दिले आहेत, अशी लेखी तक्रार या प्रभाग कार्यालयातील सहायक लेखाधिकारी व आता रेकॉर्ड विभागात काम करणाऱ्या हाफिजोद्दिन सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्तांकडे केली होती. परंतु कुलकर्णी यांनी कोणतीच कार्यवाही न केल्याने सय्यद यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली. लोकायुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत. आयुक्त कुलकर्णी यांनी जकात अधीक्षक अशोक साबळे यांनी सहायक आयुक्तपदी पदोन्नती दिल्याने अनेक कर्मचारी नाराज आहेत. आयुक्तांची छत्रछाया मिळाल्याने साबळे आकसबुध्दीने कसा छळ करत आहे, याबाबत अनेक कर्मचा-यांनी "दिव्य मराठी'कडे तक्रारी केल्या आहेत.
पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य, आस्थापना अशा सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचारी एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यातूनच एकमेकांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचा अनेक कर्मचारी प्रयत्न करत आहेत. अनधिकृत नळजोडाबाबत लोकायुक्तांकडे करण्यात आलेली तक्रार, हे त्याचेच एक उदाहरण आहे. आपसातील कुरघोड्यांमुळे अनेक कर्मचारी नाहक पिसले जात आहेत. आयुक्त व त्यांच्या मर्जीतील अिधकारी व कर्मचारी मात्र स्वत:चा स्वार्थ साधत आहेत. कर्मचाऱ्यांमधील या शीतयुध्दास खतपाणी घालण्याऐवजी ते थांबवण्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे मत काही कर्मचा-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर "दिव्य मराठी'कडे व्यक्त केले.
50 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड
शहरातील एकूण मालमत्तांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली असताना मनपाकडे केवळ 46 हजार अधिकृत नळजोडांची नोंद आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट होते. झेंडीगेट प्रभागात पाच हजार बोगस नळजोड असल्याची तक्रार लोकायुक्तांपर्यंत पोहोचली.