आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाऐवजी गरज चौकांत भुयारी मार्गांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वाहतुकीचे सुयोग्य नियोजन, महत्त्वाच्या चौकांत भुयारी मार्ग (अंडर पास वे), बाह्यवळण रस्ता सुरू करणे, हेच नगर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे उपाय आहेत. ते प्रभावीपणे राबवल्यास स्टेशनरस्त्यावर उड्डाणपुलाचीही गरज राहणार नाही, असे नगरमधील प्रसिद्ध वास्तुविशारद अर्शद शेख यांनी सुचवले आहे. त्यासाठी त्यांनी वाहतूक आराखडा तयार केला आहे. तो त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे सुपूर्द केला.

नगर हे दळणवळणचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे मराठवाडा व विदर्भ, पुण्या-मुंबईशी जोडणारे शहर आहे. विदर्भ व मराठवाड्यातून पुढे जाणार्‍या सर्व वाहनांना नाईलाजाने का होईना ‘नगरदर्शन’ घडते. शहरात मुख्य मार्गावर होणार्‍या वाहतुकीचे मोठे प्रमाण हे बाहेरच्या वाहतुकीचे आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यावर अपघात हा नित्याचा चिंतेचा विषय झाला आहे. येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. अपघाताबरोबरच नगरकर वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. त्यावर वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वेगवेगळे उपाय सूचवण्यात येत आहेत. परंतु फक्त वाहतुकीचे नियम पाळून ही समस्या सुटणार नाही, तर याला सुयोग्य नियोजनाची गरज आहे, असे शेख यांचे म्हणणे आहे.

शहरातील वाहतुकीच्या समस्येचे मुख्य कारण हे बाहेरच्या ठिकाणाहून येणार्‍या वाहनांची गर्दी हे आहे. याचे योग्य नियोजन केल्यास शहरातून जाणार्‍या महामार्गावर वाहतुकीत मोठी घट होईल व पर्यायाने अपघात तसेच वाहतूक कोंडीची समस्याही आटोक्यात येईल.

वळण रस्त्याची मोठी गरज
योग्य नियोजन म्हणजे बाहेरच्या वाहतुकीला विनाकारण शहरात येऊ न देता शहराबाहेरून बाह्यवळण देणे. औरंगाबाद-पुणे व मनमाड-पुणे मार्गाला जोडणारा वळण रस्ता लवकरच सुरू करण्याची घोषणा झाली आहे. परंतु हा रस्ता खराब असल्यामुळे त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रथम या रस्त्यांना वाहतूक योग्य करावे लागेल. त्यावर रस्ता दुभाजकाची सोय केल्यावर वाहतुकीसाठी बाह्यवळणचा उपयोग होईल.

नांदेड, बीड व मराठवाड्याकडून पुण्याला जाणारा रस्ताही शहरातून जातो. ही वाहतूक सोलापूर रोडकडून फराहबागमार्गे अरणगाव येथून वळवली, तर वाहतुकीला सोयीस्कररित्या कमी वेळेमध्ये नगर शहर पार करता येईल. शहरालाही या वाहतुकीचा त्रास होणार नाही. हे दोन बाह्यवळण रस्ते योग्यरित्या कार्यान्वित झाल्यास शहरातील महामार्गावरील वाहतुकीत घट होईल. नाशिक-संगमनेरकडून सोलापूरमार्गे दक्षिणेकडे जाणार्‍या वाहतुकीला देखील या बायपासमुळे शहराच्या बाहेरून वळवता येईल. अशाप्रकारे फक्त बायपासच्या नियोजनाने शहरातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघू शकेल.

वाहतुकीवर हवा तंत्रज्ञानाचा डोळा
वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगभर कॅमेर्‍यांचा वापर केला जात आहे. मॉनिटरिंगसाठी जागोजागी कॅमेर्‍यांची व्यवस्था केल्यास व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांस दंड केल्यास (दिल्लीप्रमाणे) लोकांचे जीव सुरक्षित राहू शकेल व रस्त्यावर अतिक्रमणे देखील होऊ शकणार नाहीत.

डीएसपी चौकातही भुयारी मार्ग हवा
भविष्यात गर्दीमुळे डीएसपी चौकदेखील धोकादायक व अपघातग्रस्त चौक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे देखील तारकपूरकडून भिंगार कॅन्टोन्मेंटकडे जाणारा रस्ता हा अंडर वे केल्यास या रस्त्यावर औरंगाबाद-पुणे रस्त्यावर या चौकात कोणताच अडथळा राहणार नाही. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या नियंत्रणात येऊ शकेल.

उर्वरित बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...