आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडू-शेवंती बाजारात लाखोंची उलाढाल, पावसामुळे यंदा उत्पादन घटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; विजयादशमीच्या मुहूर्तावर फुलांचे भाव कडाडले आहेत. फुलांच्या खरेदीसाठी नगरकरांनी बुधवारी सायंकाळी मोठी गर्दी केली होती. शहराच्या विविध भागात फुलांची विक्री सुरू आहे. झेंडूच्या फुलांचे दर ८०, तर शेवंती अस्टरच्या फुलांचे दर दीडशे रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत फुलांचे दर दुप्पट झाल्याने फुलबाजारात लाखोंनी उलाढाल वाढली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांचा बाजार यंदा कडाडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. दसरा-दिवाळी हे मोठे मुहूर्त आहेत. त्यामुळे दोन्ही सणांना फुलांना मोठी मागणी असते. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत. शस्त्रपूजन, तसेच घर सजावटीसाठी बुधवारी सायंकाळीच अनेकांनी फुलांची खरेदी केली. दिल्लीगेट, चितळे रस्ता, कापड बाजार, माळीवाडा, प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक आदी ठिकाणी सकाळपासूनच फुलांच्या विक्रीचे स्टॉल लागले. शेवंतीच्या फुलांची शंभर ते दीडशे रुपयांनी विक्री झाली, तर झेंडूची फुले ८० रुपये किलो होती.

फुलांचे उत्पादन घटल्याने, तसेच मागणी वाढल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. शहराच्या विविध भागात फुलांचे ढीग लावून त्यांची विक्री सुरू होती. नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोठी रस्त्यासह दिल्लीगेट, चितळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
दसऱ्याच्या दिवशी सकाळपासूनच शहरातील विविध भागात खरेदीसाठी गर्दी होणार आहे. अनेकांनी आदल्या दिवशीच खरेदी केली. वाहनांचे शोरूम, सोने कपड्यांच्या दुकानांमध्येही दिवसभर मोठी गर्दी होती. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपकी एक मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दुचाकी, चारचाकी, सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदींची खरेदी नागरिक विजयादशमीच्या मुहूर्तावर करतात. त्यासाठीही बाजारपेठ सजली आहे.

पुण्यापेक्षा दर कमी
फुलांचेदर वाढले असले, तरी ते पुणे शहरापेक्षा कमीच आहेत. फुलांचे हे दर दिवाळीपर्यंत स्थिर राहतील. नगर शहरात फुलांना चांगली मागणी आहे. विजयदशमीच्या दिवशी विक्रीत मोठी वाढ होईल. शेवंतीपेक्षा झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे.'' भिवामांढरे, फुलांचे विक्रेते.

पाऊस नसल्याने उत्पादनात घट
यंदासमाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे फुलांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी फुलांचे दर वाढले आहेत. दर वाढल्याने अनेकजण एक िकलोऐवजी अर्धा िकलोच फुले खरेदी करत आहेत. बुधवारी सकाळपासूनच फुलांच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे.'' बापूसाहेबजासूद, फुलांचे विक्रेते.

वाहतूक नियंत्रण कोलमडले
नगरशहराच्या विविध भागात बुधवारी सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. दिल्लीगेट परिसरात तर पायी चालणेदेखील अवघड झाले होते. विजयादशमीला अशीच परिस्थिती राहील. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पोलिसांनी कोलमडलेली वाहतूक व्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी नगरकरांची मागणी आहे. अनेक ठिकाणचे सिग्नलही सध्या बंद आहेत. ते सुरू करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.