आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाच्या वादावर लवादाचा वेळकाढूपणा, जानेवारी होणारी बैठकही ढकलण्यात आली पुढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-शिरूररस्ता चौपदरीकरणाचा भाग असलेल्या शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचे लवादासमोर भजित पडलेल घोंगडे आणखी काही काळ तसेच राहणार आहे. पुलाच्या खर्चासंदर्भात ठेकेदार बांधकाम विभागात सुरू असलेला वाद लवादासमोर सुरू असून गेल्या दोन महिन्यांपासून लवादाची बैठक लांबत आहे. संबंधित वाद समजून घेण्यापर्यंतच लवादाचे कामकाज पुढे सरकले आहे. त्यामुळे पुलाच्या भवितव्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उड्डाणपूल व्हावा, यासाठी सर्वपक्षीय आंदोलने झाली आहेत. थेट टोलनाका बंद पाडण्यापर्यंत आंदोलने झाली. मात्र, सातत्याने हा विषय लांबणीवर पडत आहे. निविदेनुसार तीन वर्षांपूर्वीच पुलाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, भूसंपादनाचा विलंब झाल्याने काम लांबत गेले. निविदा कलमानुसार ठेकेदाराने कामाच्या पहिल्या टप्प्यातच पुलाचे २५ टक्के काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, पुलाचे सर्व काम दुसऱ्या टप्प्यात वर्ग करण्यात आले. दुसऱ्या टप्प्याची मुदत संपल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली.

आंदोलनाच्या जनरेट्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न तीन वर्षांपूर्वी मार्गी लागला. त्यानंतर बांधकाम विभागाने काम पूर्ण करा; अन्यथा टोल तात्पुरता बंद करण्याची नोटीस बजावली. या नोटिशीला ठेकेदाराने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. जिल्हा न्यायालयाने ठेकेदाराने नोटिशीला दिलेले आव्हान फेटाळून लावले. त्यामुळे ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, निवृत्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा त्रिस्तरीय लवाद नियुक्त करण्यात आला. लवादाची स्थापना होऊनही आता वर्ष होत आले आहे.

नगरकरांसाठी जिव्हाळ्याच्या या प्रश्नाला सुरुवातीपासून ग्रहण लागले आहे. लवादाच्या स्थापनेनंतर तरी जलदगतीने कामकाज होऊन निर्णय अपेक्षित होता. मात्र, लवादाच्या बैठका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. ठेकेदार बांधकाम विभागाने लेखी म्हणणे लवादासमोर मांडले आहे. हा वाद समजून घेण्यापर्यंतचेच लवादाचे काम पुढे सरकले आहे. डिसेंबर महिन्यातील बैठक जानेवारीत ढकलण्यात आली होती. मात्र, जानेवारीतील नियोजित बैठक होऊ शकली नाही. ती आता फेब्रुवारीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच गंभीर जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लवादाकडून वेळकाढूपणा होत असल्याचे चित्र आहे.