आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे उड्डाणपुलासाठी व रिंगरोडसाठी 14 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्ती व रेल्वे उड्डाणपुलासाठी 14 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी वित्त विभागाला दिले. स्टेशन रस्त्यावरील प्रलंबित उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्याच्या कामाबाबत सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, उड्डाणपुलाच्या कामाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथी भवनात झालेल्या बैठकीला पालकमंत्री मधुकर पिचड, महापौर संग्राम जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एच. एस. पाटील, कार्यकारी अभियंता बी. डी. कुलकर्णी, ए. एस. खैरे, उपअभियंता ए. एस. पोवार आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार 5 जुलैला शहरात आले असता महापौर जगताप, आमदार अनिल राठोड यांनी स्वतंत्रपणे त्यांची भेट घेत बाह्यवळण रस्ता व उड्डाणपुलाच्या कामांबाबत निधीची मागणी केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी ही बैठक झाली. बाह्यवळण रस्ता नादुरुस्त असल्याने जडवाहतूक शहरातून जाते. परिणामी अपघातांचे प्रमाण व वाहतूक कोंडी वाढल्याचे महापौरांनी निदर्शनास आणून दिले. यावर पवार यांनी 10 कोटी रुपये बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व 4 कोटी रुपये या रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी देण्याचे आदेश वित्त विभागाच्या अधिका-यांना दिले.
आमच्या आंदोलनाला यश
बाह्यवळण रस्ता सुरू होऊनही अवजड वाहतूक शहरातूनच जात असल्याने अनेकदा अपघात होतात. याबाबत राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. नगर दौ-यावर आलेले उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे या रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. पवार यांनी मुंबईत बोलावून बैठक घेतली. यात बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 10 कोटी व रेल्वे पुलासाठी चार कोटी असे 14 कोटी देण्याचे निर्देश पवार यांनी वित्त विभागाला दिले.’’ संग्राम जगताप, महापौर.
भुजबळांचे आश्वासन; पवारांची पूर्तता निंबळक शिवारातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री भुजबळ यांनी बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेचार कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. पाच महिन्यांनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी या आश्वासनाची पूर्तता करताना आश्वासनाच्या दुपटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला. या बैठकीला भुजबळांची अनुपस्थिती चर्चेचा विषय झाला होता.