नगर- नगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या राज्यात जसा सर्वात मोठा आहे, तसेच त्याचे प्रश्नही मोठे आहेत. ते सोडवण्यासाठी शिक्षण, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
मराठा चेंबर्सतर्फे आयोजित आय. एम. एस. संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी चेंबर्सचे अध्यक्ष व एल अँण्ड टी कंपनीचे सह सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष योगेश देव, प्रकाश गांधी, सुखलाल संकलेचा, वैशाली कोलते, जितेंद्र बडगुजर, ‘आमी’चे अध्यक्ष अशोक सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. कोलते यांनी गेल्या 4 दशकांपासून वाणिज्य विभागात केलेल्या भरीव शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना राज्याच्या वाणिज्य परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पार्श्वभूमीवर मराठा चेंबर्सतर्फे डॉ. कोलते यांच्यासह जिल्हाधिकारी कवडे यांचा सन्मान करण्यात आला.
कवडे म्हणाले, जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण, आरोग्य व औद्योगिक क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. डॉ. कोलते यांच्या वाणिज्य क्षेत्रातील अनुभवाचा येथील उद्योजकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. कोलते यांच्याबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी काही उपक्रम राबवण्याचा विचार असल्याचेही कवडे यांनी सांगितले. मलेशिया देशाचा जन्म भारतानंतर झाला, तरी तेथे शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येत असल्याने हा देश आपल्यापेक्षा पुढारलेला आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.