आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३०० जनावरांसाठीही आता मिळेल छावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जनावरांच्या छावण्या देण्याबाबतची नियमावली जटिल असल्याची तक्रार जिल्ह्यातील आमदारांनी करताच महसूल तथा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ५०० जनावरांसाठी छावणी देण्याचा निकष असला, तरी गरज असेल त्याठिकाणी ३०० जनावरांची छावणी सुरू करावी, असे स्पष्ट केले. पशुधनाची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. त्याआधारावर टँकरच्या जास्तीच्या खेपा सुरू करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिले.

जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी मंत्री खडसे यांच्या उपस्थितीत गुरूवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी खासदार दिलीप गांधी,आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, राहुल जगताप, भाऊसाहेब कांबळे, विजय आैटी, बाळासाहेब मुरकुटे स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, जिल्हाधिकारी कवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कवडे यांनी जिल्ह्यातील टंचाई स्थितीची माहिती दिली. आमदार आैटी म्हणाले, जनावरांसाठी स्वतंत्र टँकर मिळत नाही, तसेच छावणी सुरू करण्यासाठी घालून दिलेली नियामावली जाचक आहे. दहा लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम ५०० जनावरांसाठी छावणी, अंतराची अट यामुळे लोकांच्या मनात शासनाच्या निर्णयाबद्दल संशय निर्माण झाला आहे. यावर मंत्री खडसे म्हणाले, गावातील पशुधन संख्येची संपूर्ण माहिती पशुधन अधिकाऱ्यांकडे आहे. त्या आधारावर पशुधनाच्या प्रमाणात आवश्यक टँकरची व्यवस्था करता येईल.

आमदार राजळे यांनी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून पिण्याच्या पाण्यासाठी तीन तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली. प्रस्ताव देऊनही छावण्या मंजूर केल्या जात नाही, असेही त्या म्हणाल्या. यावर मंत्री खडसे यांनी प्रत्येक प्रस्ताव बारकाईने तपासता गरज असेल तेथे छावण्या द्याव्यात, असे प्रशासनाला सांगितले.

आमदार कर्डिले यांनी छावण्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून गरज तेथे छावण्या द्याव्यात, अशी मागणी केली. त्यावर मंत्री खडसे यांनी छावणी देताना त्यांतील अंतर पाच किलोमीटर आणावे. जनावरांची संख्या ५०० किंवा ३०० असली, तरी छावण्या देता येतील. तसे अधिकारी मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी नियम शिथिल करावेत, असे सांगितले. अध्यक्ष गुंड यांनी नरेगाअंतर्गत अपूर्ण असलेल्या सुमारे हजार विहिरींकडे लक्ष वेधले. त्यावर खडसे यांनी ही योजना केंद्राची असल्याने ६०-४० प्रमाण राखावे लागेल, असे स्पष्ट केले.
टंचाई आढावा बैठकीत बोलताना महसूलमंत्री एकनाथ खडसे. समवेत खासदार गांधी.

तालुकानिहाय जेसीबी देणार
जेसीबीदिल्यास जलयुक्त, तसेच बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सोपे होईल, अशी सूचना खासदार दिलीप गांधी यांनी मांडली. त्यावर मंत्री खडसे यांनी तालुकानिहाय जेसीबी देण्यात येतील. जलयुक्तच्या कामासाठी कोणी जेसीबी खरेदी केला, तर त्याचे व्याजही देण्यात येईल, असे सांगितले.

वीज जोड तोडू नका
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या कोणत्याही योजनेचे वीजजोड तोडू नका, असे मंत्री एकनाथ खडसे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. कृषिपंपाचे वीजबिल माफ करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेकॉर्डब्रेक टँकर संख्या
नगर जिल्ह्याला सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. सन २००३ मध्ये जिल्ह्यात ६१९, तर सन २०१२ मध्ये ७०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. एप्रिल २०१६ मध्ये ही संख्या ६६८ आहे. पुढील महिन्यात ही संख्या ८०० वर जाण्याची शक्यता आहे.