आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळेबाजांचे धाबे दणाणले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बिहारमधील चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव तुरुंगात जाताच महाराष्ट्रातील चारा घोटाळा चर्चेत आला आहे. साध्या लूना मोपेड, मोटारसायकलवरून दहा-बारा टन चारा वाहण्याचा भीमपराक्रम नगर जिल्ह्यातील चारा डेपो व छावणीचालकांनी प्रशासनाच्या मदतीने केल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे. दुष्काळी उपाययोजनांत राज्यात चार्‍यावर सर्वाधिक खर्च झालेल्या नगर जिल्ह्यात सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्याने या घोटाळ्याशी संबंध असणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

नगर जिल्ह्यात 2011-12 व 12-13 या आर्थिक वर्षात दुष्काळी उपाययोजना राबवण्यात आल्या. केवळ चार्‍यावर दररोज एक कोटी खर्च केला गेला. सुरुवातीला डेपोच्या माध्यमातून चारा पुरवण्यात आला. डेपोंची संख्या 119 पर्यंत गेली होती. जून 2012 पासून डेपो बंद करून छावण्या सुरू करण्यात आल्या. ऑगस्ट 2013 पर्यंत काही ठिकाणी छावण्या सुरू होत्या. पावसाने दिलासा दिल्यानंतर छावण्या बंद करण्यात आल्या. चारा डेपोंवर 94 कोटी व छावण्यांवर 288 कोटी असे 382 कोटी खर्च करण्यात आले.

बारडगाव दगडी येथील एकनाथ पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, तत्कालीन तहसीलदार, मंडलाधिकारी, वजनकाटा चालक, चारा पुरवठादार, वाहनमालक-चालक यांनी संगनमताने लूना, मोपेड, मोटारसायकल, जेसीबी आदी वाहनांवर तब्बल नऊ ते बारा टन चारा वाहून आणल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले. या चारा घोटाळ्यावर गेल्या हिवाळी अधिवेशनात वादळी चर्चा झाली. आश्वासनाप्रमाणे डिसेंबर 2012 मध्ये सीआयडी चौकशी सुरु करण्यात आली. चौकशी अधिकार्‍याने दोषी आढळलेल्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र, चौकशी सुरू होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटत आला, तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. चौकशी अधिकार्‍याने अहवाल सरकारला सादर केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. कारवाईच करायची नव्हती तर चौकशीचा फार्स का करण्यात आला? असा प्रo्न उपस्थित होत आहे.

पाथर्डी तालुक्यात असाच गैरव्यवहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अँड. श्याम आसावा यांनी जिल्ह्याधिकार्‍यांकडे केली. तक्रारीबरोबर माहिती अधिकारात मिळवलेली कागदपत्रे जोडण्यात आली होती. तक्रार करून चार महिने उलटले, तरी साधी चौकशी झाली नसल्याचे अँड. आसावा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

दक्षिणेतील प्रत्येक तालुक्यात घोटाळे झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे आल्या आहेत. मात्र, एकाही प्रकरणाची साधी चौकशीही झाली नाही. राजकीय पार्श्वभूमी पाहूनच प्रशासनाने डेपो व छावण्या चालवायला दिल्याचा आरोप काँग्रेसच्या मंत्र्यांकडून करण्यात आले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी घोटाळ्याच्या चौकशीबाबत पाठपुरावा केला. गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लालू तुरुंगात घालण्याचा इशारा नगरमध्ये बोलताना दिला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारा घोटाळ्याच्या चौकशीवरील धूळ झटकली जाण्याची शक्यता असून नव्याने काही प्रकरणांची चौकशी होऊ शकते.

नंतर काही झाले नाही..
माहितीच्या अधिकारात मी बारडगाव दगडी चारा डेपोतील गैरव्यवहार उघडकीस आणला. तावडे यांनी 19 डिसेंबर 2012 रोजी या घोटाळ्याबाबत अधिवेशनात आवाज उठवला. गृहमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आश्वासन दिले. त्याचदिवशी सायंकाळी सीआयडीचे अधिकारी प्रकाश मुत्याल कर्जतला पोहोचले. मात्र, या चौकशीचे पुढे काय झाले काहीच कळायला मार्ग नाही.’’ अनिल शर्मा, तक्रारदार.

असे काही घडलेच नाही
ज्याला काही करावयाचे नाही, अशी मंडळी बेलगाम आरोप करतात. आपण चारा वाटपात कोणताही गैरव्यवहार होऊ दिलेला नाही. चारा वाटपादरम्यान प्रत्येक दिवशी मी संबंधित अधिकार्‍यांकडून अहवाल मागवत होतो. जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांचे चांगले काम झाले आहे. कुठेही घोटाळा झालेला नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत.’’ बबनराव पाचपुते, तत्कालीन पालकमंत्री