आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fodder Shortage : 60 Thousands Cattle In Truble In Rahuri Taluka

चाराटंचाई : राहुरी तालुक्यातील 60 हजार पशु संकटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - तालुक्यातील दुष्काळग्रस्त तीन जिल्हा परिषद गटांत एप्रिलअखेरपासूनच चाराटंचाई भासणार आहे. त्यामुळे 60 हजार पशुधन संकटात येणार असून शासनाने वांबोरी, कणगर, कानडगाव, ताहराबाद, राहुरी खुर्द येथे चारा व छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

तालुक्यात एकूण 82 ग्रामपंचायती असून पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत. पाच गटांपैकी बारागाव नांदूर, सात्रळ व वांबोरी या तीन गटांतील बहुतांश गावांतील खरीप व रब्बीची पैसेवारी 50 पैशांखालील असल्याने ही गावे दुष्काळग्रस्त आहेत. याशिवाय अन्य अनेक गावांतही अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार राहुरी तालुक्यात एकूण अडीच लाख पशुधन आहे. यामध्ये गाई, म्हशी, मेंढरे, शेळ्या यांचा समावेश आहे. या पशुधनाला दररोज अडीच हजार मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. महिन्याला 74 हजार मेट्रिक टन चारा लागणार आहे. अपेक्षित उत्पादन 5 लाख 13 हजार मेट्रिक टन असून एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याने चाराटंचाई भासणार आहे. त्यादृष्टीने चारा उत्पादन गरजेचे आहे. मात्र, पाणी व चारा टंचाईमुळे पशुधन संक टात येणार आहे.

बारागाव नांदूर गटात 2 खरिपाची व 8 रब्बीची गावे आहेत. या गटात 18 हजार जनावरे असून राहुरी खुर्द व बारागाव नांदूर या गावांत छावण्या व चारा डेपो उभारणे आवश्यक आहे. वांबोरी गटातील 7 रब्बीच्या गावांचा दुष्काळी म्हणून समावेश असून जवळपास 23 हजार जनावरे या गटात आहेत. वांबोरी, धामोरी खुर्द येथे छावण्या उघडणे गरजेचे आहे. सात्रळ गटात 23 हजार जनावरे आहेत. या गटातील 12 रब्बी व 8 खरिपाच्या गावांची 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असून सात्रळ, कणगर, कानडगाव या ठिकाणी छावण्यांची आवश्यकता आहे.दुष्काळी भागात 60 हजार जनावरे आहेत. एप्रिलअखेर व मे महिन्यात या ठिकाणी चारा उपलब्ध न झाल्यास ब्राrाणी, उंबरे, सडे, मोकळओहोळ, चेडगाव या भागातील ऊस चारा म्हणून उपयोगात आणण्याचे प्रस्तावित आहे. ताहराबादकडील बारागाव नांदूर, राहुरी खुर्द, राहुरी बुद्रूक, डिग्रस, देसवंडी, म्हैसगाव, चिखलठाण, दरडगाव, तसेच कणगरकडील देवळाली प्रवरा, सोनगाव गावांतील उसाचा चार्‍यासाठी वापर करण्याचे नियोजन आहे.

चारा उत्पादनाचे नियोजन आवश्यक
महात्मा फुले कृषी विद्यापीठ व डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये मका, कडवळ व चारापिके यांचे नियोजन करून लागवड केल्यास टंचाई काळात त्याचा उपयोग होईल. मात्र, जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत संबंधित संस्थांशी चर्चा होणे गरजेचे आहे.


या गावांत छावण्यांची गरज
तालुक्यातील वांबोरी, कणगर, ताहराबाद, कानडगाव, राहुरी खुर्द या ठिकाणी जनावरांच्या छावण्या व चारा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पंचायत समिती स्तरावर कणगर, ताहराबाद, वांबोरी येथे संभाव्य चाराडेपो किंवा छावण्यासाठी नियोजित प्रस्ताव आहे.