आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - आयुक्त विजय कुलकर्णी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत सांगितले.

या बैठकीस उपायुक्त (सामान्य) अजय चारठाणकर, मुख्य लेखापरीक्षक श्रीकांत अनारसे, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, शहर अभियंता नंदकुमार मगर, पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम, अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे, सर्व प्रभाग अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

आयुक्त कुलकर्णी व उपायुक्त चारठाणकर यांनी विभागप्रमुखांना आचारसंहितेच्या अनुषंगाने काय काळजी घ्यायची याबाबत सूचना दिल्या. महापालिका हद्दीतील सर्व फलक, राजकीय साहित्य, पोस्टर, झेंडे, पताका, पक्षांची चिन्हे, भिंतीवर लिहिलेला मजकूर तातडीने काढून टाकावे. त्यानंतर दैनंदिन अहवाल सादर करावा. प्रभाग अधिकाऱ्यांनी सकाळी व सायंकाळी प्रभागाची पाहणी करून नव्याने फलक लावले जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
गांधी मैदान, क्रीडा संकुल, जॉगिंग पार्क, तसेच विविध मोक्याच्या जागा वापरण्यासाठी केवळ एकाच दिवसाची परवानगी द्यावी. जो प्रथम येईल व आवश्यक ते शुल्क भरेल त्याच व्यक्तीला प्राधान्याने परवानगी द्यावी. मनपामार्फत पदाधिकाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सुविधा काढून घ्याव्यात. सध्या सुरू असलेली कामे सुरू ठेवावीत, परंतु नवीन कामे सुरू करू नयेत. ज्या कामांचा कार्यारंभ आदेश दिला आहे, ती कामे सुरू करू नयेत.
मतदान केंद्रांवरील फर्निचर, लाइट, पाणी, रॅम्प, खिडक्यांची दुरुस्ती याबाबत सूचना द्याव्यात. मतदान केंद्र परिसरात स्वच्छता व रस्त्यांची योग्य देखभाल करावी, समन्वय राखून जबाबदारीने काम करावे, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा, अशा सूचना विभागप्रमुखांना बैठकीत देण्यात आल्या.