आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर अन्न आैषध प्रशासनाला आली जाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बालवाडीत दिल्या जाणाऱ्या राजगिरा चिक्कीत रेती आढळल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रकरणात केवळ पंचनाम्यापुरते हजर राहणारे अन्न आैषध प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. या विभागाने जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांच्याकडून चिक्कीच्या दर्जाबाबत अहवाल मागवला आहे.

शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांसाठी आहार पुरवला जातो. त्यातील चिक्की प्रकरण गाजत आहे. नगर जिल्ह्यात लाख ७७ हजार चिक्कीची पाकिटे सूर्यकांता सहकारी उद्योग संस्थेने पुरवली. चिक्कीचे वजन वाढवण्यासाठी त्यात रेती मिसळण्यात आली असल्याचा आरोप नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी केल्यानंतर बालकल्याण विभागाच्या विविध खरेदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही राज्यभर रान उठवले. या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप झाले.

महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी चिक्कीचे वाटप थांबवण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत. चिक्कीचे नमुने पंचनामे करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. एकात्मिक बालविकास आयुक्त विनिता सिंघल यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून खराब चिक्की परत करून त्याबदल्यात चांगली चिक्की मागवण्याचा अजब सल्ला दिला. तातडीने कारवाई करण्याच्या दिशेने पावले उचलण्याऐवजी पुरवठादाराने केलेल्या भेसळीचा गुन्हा सुधारण्याची संधीच आयुक्तांनी दिली, असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी आयुक्तांकडून पुरवठादाराची पाठराखण होत असल्याने नमुने परत पुरवठादाराला पाठवण्यास विरोध केला.

चिक्कीचे नमुने विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी अन्न आैषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेने बोलावले. या विभागाचे अधिकारी पंचनाम्यापुरते हजर राहिले. पण कुणाचीही तक्रार नसल्याने या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई या प्रशासनाने केली नाही. वर्तमानपत्रात यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या प्रशासनाला जाग आली. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत आता चिक्की भेसळीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वृत्तपत्रांतील बातम्यांचा संदर्भ देऊन बालकल्याण विभागाला चिक्की भेसळकारी पदार्थ आहे किंवा कसे याबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केवळ पत्रव्यवहारावर बालकांच्या आरोग्याचा खेळ प्रशासनाकडून मांडला असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात अन्न आैषध प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण फोन घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही.

आम्ही अहवाल पाठवू
चिक्कीत भेसळ आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही. भेसळीसंदर्भात तक्रार असल्याने अंगणवाड्यांतील बालकांसाठी आलेल्या चिक्कीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच भेसळ आहे किंवा कसे हे सांगता येईल. अन्न आैषध प्रशासनाने आम्हाला पाठवलेल्या पत्रानुसार त्यांना आम्ही आतापर्यंतची कार्यवाही कळवू.'' मनोजससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

काय आहे अन्न आैषध प्रशासनाच्या पत्रात
राजगिराचिक्की संदर्भात वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या चिक्कीत भेसळ आहेत किंवा कसे, निकृष्ट दर्जाच्या राजगिरा चिक्कीचा पुरवठा झाला आहे किंवा कसे, याबाबत अहवाल, केेलेल्या उपाययोजना, तसेच अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल पाठवण्याच्या सूचना अन्न आैषध प्रशासनाच्या पत्रात आहेत.

हा तर फार्स...
चिक्कीमाती मिश्रित असल्याचा विषय राज्यभर गाजत आहे. असे असतानाही अन्न औषध प्रशासनाला वर्तमानपत्रांतून हा प्रकार समजला. त्यानंतर या विभागाने चिक्कीत भेसळ आहे किंवा कसे याची विचारणा बालकल्याण विभागाकडे केली. वास्तविक अन्न आैषध प्रशासनानेच नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवणे आवश्यक होते. पण तसे करत पत्रव्यवहाराचा फार्स घालण्याचा प्रकारच संशयास्पद वाटतो.'' बाळासाहेब हराळ, सदस्य, जिल्हा परिषद.
बातम्या आणखी आहेत...