आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीने झोडपला अन्न सुरक्षेचा मुद्दा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करून लागू करण्यात आलेला अन्न सुरक्षा कायदा हा प्रचाराचा ठळक मुद्दा गारपिटीमुळे मागे पडला आहे. सध्या काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या प्रचार सभा, मेळाव्यांमध्ये गारपीटचा मुख्य मुद्दा राजकारण्यांकडून बनवला जात आहे. यामुळे अन्न सुरक्षेचा मुख्य मुद्दा गारपिटीने खाल्ला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता वाढू लागली आहे. निवडणुका जाहीर होण्यासाठी केंद्र सरकारने घाईघाईत अन्न सुरक्षा विधेयक मांडले. अनेक दशके भिजत पडलेला लोकपाल कायदा संमत करून घेतला. लोकपाल कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पेटवलेले रान व त्यांना मिळालेला प्रतिसाद यातून हा कायदा संमत करणे भाग पडले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अन्न सुरक्षा कायदा केंद्रस्थानी राहणे साहजिक होते. या कायद्याच्या अंमलबजावणीपासूनच तशी व्यूहरचना आखण्यात आली.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यात कोणत्याही सभेत या योजनेचे गोडवे गात मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, फेब्रुवारी अखेरला राज्यात सुरू झालेली अभूतपूर्व गारपीट मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सुरू राहिली. आतापर्यंत कधीही झाली नाही अशी व दीर्घकाळ झालेल्या गारपिटीने शेतकर्‍यांना मेटाकुटीला आणले. ऐनवेळी हाती आलेल्या या मुद्याचे मग राजकारण सुरू झाले. सरकार आचारसंहितेच्या कात्रीत सापडले, तर विरोधक तातडीच्या मदतीसाठी सत्ताधार्‍यांवर तुटून पडले. अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे दरमहा 35 किलो धान्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागात 75, तर शहरी भागातील 45 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यातील 32 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. लाभार्थ्यांना प्रतिकिलो एक ते तीन रुपये एवढाच खर्च येणार आहे. लाभार्थ्यांची संख्या व लाभ लक्षात घेता अन्न सुरक्षा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार हे निश्चित होते. पण गारपिटीच्या मार्‍यापुढे हा मुद्दा मागे पडला आहे. प्रचाराची राजकीय धुळवड सुरू असताना एकमेकांवर चिखलफेक करण्यात सत्ताधारी तसेच विरोधक व्यग्र आहेत. यशस्वी डावपेच करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तसेच संघटनांचा आटापिटा सुरू आहे.
निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या स्टार प्रचारकांचे दौरे सुरू झाले आहेत. नगर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राजीव राजळे, तसेच शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी जाहीर सभा घेण्यात आली. या संपूर्ण सभेत अन्न सुरक्षेच्या मुद्दय़ाला बगल देत, गारपिटीचा मुद्दा चवीने चघळण्यात आला. महायुतीच्या मेळाव्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यात सरकार कसे कुचकामी ठरले, याच्यावरच जोर देण्यात आला. याच मुद्दय़ांचे राजकीय भांडवल होत असून गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी मात्र, तातडीची मदत मिळत नसल्याने हतबल ठरत आहे.