आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अन्न सुरक्षा’च्या जनजागृतीसाठी राज्यव्यापी मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीने राज्यव्यापी मोहीम हाती घ्यावी, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी शनिवारी दिली.

केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक नुकतीच ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गांधी भवन येथे झाली. यावेळी समितीचे प्रदेशाध्यक्ष देशमुख, सरचिटणीस यशवंत हापसे, अँड. बसवराज पाटील, श्याम उमाळकर, प्रकाश सातपुते, राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अन्न सुरक्षा कायद्याविषयी सविस्तर चर्चा झाली. कायद्यातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घ्यावी. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी प्रत्येक घरापर्यंत ही योजना पोहोचवावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. केंद्र सरकारने बहुतेक योजना जनतेला त्यांचा अधिकार म्हणून दिल्या आहेत. त्यात रोजगाराचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, माहितीच्या अधिकाराचा समावेश आहे. आता समितीने सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने अन्न सुरक्षा कायदा करून ग्रामीण व शहरी भागातील गरजूंना दोन वेळच्या जेवणाचा अधिकार दिला आहे. सवलतीच्या दरात जर धान्य देऊ शकलो नाही, तर लाभार्थ्यांना रोख भत्ता देण्याची तरतूदही कायद्यात आहे. लहान मुले व गरोदर महिलांसाठी सहा हजार रुपये अनुदान देण्याची कायद्यात व्यवस्था आहे. सनियंत्रण समितीच्या पदाधिकार्‍यांनी व जनसेवकांनी या कायद्याबाबत जनजागृती करावी. दोन वर्षांत समितीच्या माध्यमातून राज्यात सेवाभावी कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा उभी राहिली असून समितीचे काम काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार 15 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौर्‍याचा प्रारंभ करण्यात येणार आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात तीन कार्यकर्त्यांची देखरेख समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.